मुंबई विद्यापीठाकडून नवे सामंजस्य करार; परदेशी विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:33 PM2023-07-31T15:33:16+5:302023-07-31T15:33:38+5:30
उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील इलिनॉस विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यासोबत रविवारी शैक्षणिक सामंजस्य करार केले.
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आयोजित ‘अखिल भारतीय शिक्षा समागम २०२३’ या कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर करार करणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील एकमेव आणि पहिले राज्य विद्यापीठ ठरले आहे.
उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील इलिनॉस विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यासोबत रविवारी शैक्षणिक सामंजस्य करार केले. इलिनॉइस विद्यापीठातर्फे प्रा. मार्टिन बर्क यांनी स्वाक्षरी केली. सेंट लुईस विद्यापीठातर्फे या करारान्वये उच्च शिक्षणातील संधीची विविध दालने खुली होणार आहेत. कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, विद्यार्थी-शिक्षक आदान–प्रदान अशा विविध विषयांवर शैक्षणिक सहकार्य या करारांमध्ये अंतर्भूत आहेत.
विविध देशांतील शिक्षण प्रणालींमध्ये होत असलेल्या परस्पर संवादांमधून विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल, तसेच सर्वोत्कृष्ट शैक्षणिक, संशोधन पद्धतींच्या सामायिकरणास प्रोत्साहन मिळेल. विद्यार्थी, संशोधकांच्या या देवाण-घेवाणीमुळे जागतिक नागरिक विकसित होण्यास मदत होईल, असे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी म्हणाले.