मुंबई : मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पदभार स्विकारल्यानंतर आपले वेगळेपण दाखविण्यास सुरवात केली आहे. दोन दिवसापूर्वी माजी आयुक्त संजय बर्वे यांनी केलेल्या २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना शनिवारी त्यांनी स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यत त्यांना पूर्वीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त न करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
बर्वे यांच्या वाढीव मुदतीला अवघे दोन दिवस उरले असताना मुंबईतील प्रत्येकी चार सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांसह एकुण २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या पशासकीय कारणास्तव तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. त्याचबरोबर बदली,पदोन्नतीवर जिल्हाबाहेर सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र नुतन आयुक्तांनी पदभार स्विकारल्यानंतर २७ फेबु्रवारी रोजी परिपत्रकाद्वारे जारी केलेले आदेश पुढील सूचनेपर्यत रद्द करण्याचे आदेश दिले. सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी त्यांच्यावतीने हे आदेश जारी केले.