मनोहर कुंभेजकर, मुंबई: शिवसेना मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबईतील पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव किरण पावसकर व राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. अनेक कार्यक्षम कार्यकर्त्यांना नवीन पदे बहाल करण्यात आली असल्याची माहिती पावसकर यांनी दिली.
सुनील नरसाळे - उपनेते, प्रमोद मांद्रेकर - दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक, सुशीबेन शहा - महिला सेना मुंबई शहर समन्वयक, प्रवक्ता (हिंदी व इंग्रजी भाषिक), सुशील व्यास - प्रवक्ता ( हिंदी व इंग्रजी भाषिक), दिलीप कुमार साकरिया - राजस्थान समाज सेल समन्वयक (कार्यक्षेत्र - मुंबई शहर),त्रिंबक तिवारी - कायदे विभाग संघटना समन्वयक (कार्यक्षेत्र - मुंबई शहर),बब्बू खान - अल्पसंख्यांक सेल समन्वयक (कार्यक्षेत्र-दक्षिण मुंबई लोकसभा) या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना पक्षाचे सशक्तीकरण होईल. खासदार मिलिंद देवरा यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रदीर्घ कामाच्या अनुभवाचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला होईल.
यावेळी किरण पावसकर म्हणाले की, खासदार मिलिंद देवरा केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने काँग्रेसमध्ये राहून मुंबईमध्ये विविध विकासकामे केलेली आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांचे काम पाहिलेले आहे आणि त्यांच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. देवरा यांच्या सोबत त्या वेळेस त्यांच्यासोबत काम करणाऱ्या काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केलेला होता. त्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षे केलेल्या कामाचा अनुभव याचा शिवसेना पक्षाला येणाऱ्या काळात फायदा व्हावा यासाठी त्यांना शिवसेना पक्षातर्फे ही नवीन जबाबदारी देण्यात आलेली आहे.