- प्रसाद ताम्हनकर
नव्या वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक नवं नव्या गोष्टी दाखल होत आहेत, तर काही जुन्या तंत्रज्ञानांच्या नवा आवृत्त्या दाखल होत आहेत. आजकालच्या जमान्यात मोबाइल असो, संगणक असो किंवा टिव्ही या सगळ्यांसाठी आॅपरेटिंग सीस्टिम अतिशय महत्त्वाची ठरू लागली आहे. वेगवेगळ्या आॅपरेटिंग सीस्टिम आणि त्यांची विविध वैशिष्ट्ये ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन तयार केली जात आहेत, तर जुन्या आॅपरेटिंग सीस्टिम नव्या व्हर्जनसह दाखल होत आहेत. कुठल्याही डिव्हाइसचा प्राण मानल्या जाणाऱ्या या आॅपरेटिंग सीस्टिमचे महत्त्व लक्षात घेऊन, आता काही प्रख्यात कंपन्यादेखील यावर अधिक जोमाने संशोधन करू लागल्या आहेत.एलजीची वेब ओएस ३.०एकेकाळी स्मार्ट फोन्सचा मुख्य भाग असलेले वेब ओएस सीस्टिम एलजीने आपल्या स्मार्ट टीव्हीमध्ये आणली आणि टीव्हीची संकल्पनाच बदलून गेली. आता एलजी आपल्या या वेब ओएसचे ३.० हे नव्हे, व्हर्जन टीव्हीत आणते आहे. या महिन्यात होणाऱ्या सीईएस-२०१६ या शोमध्ये याचे अधिकृत अनावरण होणार आहे. पूर्वीच्या पेक्षा जास्ती वेगवान आणि काही अनोख्या वैशिष्ट्यांसह ही वेब ओएस दाखल होते आहे. आता या नव्या व्हर्जनच्या ‘स्प्लिट स्क्रीन’ तंत्रज्ञानच्या मदतीने आपण टिव्हीच्या स्क्रीनवरती एकाच वेळी दोन चॅनेल्स बघू शकणार आहोत, तसेच एकाच वेळी एखादे चॅनेल आणि ब्लू-रे यासारख्या टिव्हीला जोडलेल्या डिव्हाइसमधले व्हिडीओ बघू शकणार आहोत. यातील स्पीकर्स सेट अपच्या साहाय्याने टिव्ही बंद असतानाही एलजीचे म्युझिक अॅप वापरता येणार आहे.अँड्रॉइड एनगुगलचेगुगलच्या पिक्सल सी या टॅबवरती काम करणाऱ्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार गुगलने आपल्या अँड्रॉइड एन या नव्या अँड्रॉइड व्हर्जनवरती काम करण्यास सुरुवातदेखील केली असून, ही आॅपरेटिंग सीस्टिम लवकरच दाखल होते आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अँड्रॉइडचे नुकतेच आलेले मार्शमॅलो ६.० हे व्हर्जन अजून बऱ्याचशा फोनमध्ये आलेले नसताना या नव्या व्हर्जनची घाई गुगलकडून केली जात आहे. अँड्रॉइड एनमध्येही स्प्लिट विंडोची सुविधा देण्यात आली असून, त्यामुळे मोबाइलवरती एकाच वेळी दोन अॅप्लिकेशन्स वापरता येणे शक्य होणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या सरफेस टॅबमध्ये आणि अॅपलच्या नवीन आयपॅडमध्ये ही सुविधा आधीपासूनच देण्यात आलेली आहे. गुगलकडून अजून या आॅपरेटिंग सीस्टिमच्या इतर फीचर्सविषयी काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.फायरफॉक्सची ओएस बंद होणारएका बाजूला बाजारात नव्या नव्या डिव्हाइसेस साठीच्या आॅपरेटिंग सीस्टिम नव्या तंत्रज्ञानासह दाखल होत असतानाच, दुसरीकडे फायरफॉक्सने मात्र आपली ओएस बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे फायरफॉक्स आॅपरेटिंग सीस्टिमवर आधारित अवघ्या ५० डॉलर्समध्ये मिळू शकेल, अशा फोनच्या निर्मितीच्या बातम्याही संपुष्टात आल्या आहेत. ओपनसोर्स असणाऱ्या या आॅपरेटिंग सीस्टिमच्या साहाय्याने या आधी अल्काटेल आणि स्पाइस यांनी काही मोबाइल मॉडेल्स तयार केली होती. त्याच अनुभवावरून या सीस्टिमच्या साहाय्याने अत्यंत कमी किमतीत स्मार्टफोन्सचे उत्पाद करणे शक्य असल्याचे दावे केले जात होते. ग्राहकांना आम्ही या आॅपरेटिंग सीस्टिमद्वारे ‘बेस्ट’ देण्यात अपयशी ठरल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आणि अवघ्या दोनच वर्षांपूर्वी तयार झालेली ही ओएस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.भारताची आॅपरेटिंग सीस्टिमभारत सरकारने शासकीय कामांसाठी स्वत:ची भारत आॅपरेटिंग सीस्टिम सोल्युशन्स अर्थात 'बॉस' या नावाची आॅपरेटिंग सीस्टिम चालू केली आहे. भविष्यात मायक्रोसॉफ्टच्या विंडोज, तसेच इतर आॅपरेटिंग सीस्टिमची जागा ही ‘बॉस’ घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लिनक्स या ओपनसोर्स सीस्टिमच्या मदतीने २०१३ साली प्रथम ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यानंतर तिच्या काही चाचण्या विविध सरकारी कार्यालयांमध्ये घेण्यात आल्या. आता तिचे अत्याधुनिक व अधिक सुरक्षित असे व्हर्जन बनवण्यात आले आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ एडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अर्थात सी-डॅकने ही सीस्टिम विकसित केली आहे. इतर आॅपरेटिंग सीस्टिममध्ये असलेल्या सुरक्षेच्या काही गंभीर त्रुटींवरती पर्याय म्हणून या सीस्टिमच्या वापराला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.