नवीन ऑक्सिजन प्लांट होणार 17 ऑगस्टपासून कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 10:02 AM2021-08-11T10:02:42+5:302021-08-11T10:03:04+5:30
अतिरिक्त आयुक्त काकाणी यांची माहिती; तिसरी लाट रोखण्याची तयारी
मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १६ ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आले आहेत. १५ ऑगस्ट रोजी त्यांची चाचणी करून १७ ऑगस्टपर्यंत ते कार्यान्वित करण्यात येतील. या प्लांटद्वारे दररोज ४८ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याने, मुंबईत सध्या ३,९६१ सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे काही महिन्यांपूर्वी आवाक्याबाहेर गेलेली ऑक्सिजनची मागणी आता कमी झाली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने, महापालिकेने ऑक्सिजन निर्मिती आत्मनिर्भर होण्याची दृष्टीने तयारी केली आहे.
यासाठी पालिका रुग्णालयामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि लिक्विड सिलिंडरची खरेदीही करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, बाधित रुग्णांची संख्या संख्या झपाट्याने वाढल्यामुळे मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. एप्रिल, २०२१ मध्ये ऑक्सिजनची दररोजची मागणी २७० मेट्रिक टन एवढी होती.
सध्या रुग्ण संख्या कमी असली, तरी दररोज दोनशे मेट्रिक टन वैद्यकीय प्राणवायूची आवश्यकता भासते. भविष्यात अशी आणीबाणीची परिस्थिती टाळण्यासाठी मागणीपेक्षा दुप्पट ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी पालिकेचे नियोजन सुरू आहे.
ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न
पालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये एकूण १६ ठिकाणी वातावरणातील हवा शोषून त्यातून ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या संयंत्राची उभारणी करण्यात येत आहे. सीएसआर फंड आणि पालिकेच्या खर्चातून ऑक्सिजन रीफिलिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. कस्तुरबा, भाभा आणि कूपर अशा तीन रुग्णालयांमध्ये सीएसआर फंडातून सात प्रकल्प उभारण्यात आले आहेत, तसेच आणखी नऊ रुग्णालयांमध्ये असे प्रकल्प उभारून ४१ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. प्रति दिन एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा निर्माण होणार आहे. सुमारे २४० कोटींचे आणखी असे ४५ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान १० ते १३ किलोलीटर टाकीची व्यवस्था असलेल्या रुग्णालयांमध्ये दोन पुरवठादारांमार्फत ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. अशा २१ टाक्या होत्या.
गोरेगाव नेस्को, वरळी एनएससीआय, भायखळा येथील रीचर्डसन अँड क्रुडस आणि सायन येथील सोमय्या जम्बो कोविड केंद्रामध्ये १३ किलोलीटरच्या चार टाक्या बसविण्याचा पालिकेचा विचार आहे, तर महालक्ष्मी येथे दररोज शंभर ड्युरा सिलिंडर भरता येतील, यासाठी भरणा केंद्र उभारले जाणार आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पाइप्ड लिक्विड गॅससह सिलिंडर गॅसचाही साठा करण्यात येणार आहे. दोनशे लीटर क्षमतेचे मायक्रो पोर्टेबल लिक्विड ११० सिलिंडरची खरेदी करण्यात येत आहे.