राजकीय सत्तेसाठी ओबीसींचा नवा पक्ष; ‘ओबीसी बहुजन पार्टी’ ची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:36 PM2024-02-14T16:36:54+5:302024-02-14T16:39:09+5:30
महाराष्ट्रातील वंचित समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत ‘ओबीसी बहुजन पार्टी’ ची ५ फेब्रुवारी रोजी स्थापना करण्यात आली आहे.
श्रीकांत जाधव ,मुंबई : ‘ओबीसीची मते, पक्ष, नेता आणि सत्ता आणावयाची असेल तर राज्यातील ओबीसी वर्गाला राजकीय सत्ता काबिज करण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने महाराष्ट्रातील वंचित समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत ‘ओबीसी बहुजन पार्टी’ ची ५ फेब्रुवारी रोजी स्थापना करण्यात आली आहे. त्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश ( अण्णा ) शेंडगे यांनी येथे केली.
नवीन ‘ओबीसी बहुजन पार्टी’ चे उद्देश आणि ध्येयधोरणे स्पष्ट करण्यासाठी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी बुधवारी पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला.
जवळपास ६० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना सत्तेपासून दूर ठेवून केवळ स्वार्थासाठी त्यांच्या मतांचा वापर केला गेला. त्यांच्या समस्यांकडे कधीच गांभिर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे ओबीसी सर्वच बाबतीत वंचित राहिला. राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय शोषित, पिडीत, वंचित, दलित वर्गाचे कल्याण अजिबात साधले जाणार नाही.
सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांची सत्तेची मक्तेदारी मोडीत काढल्याशिवाय व स्वत: राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय ओबीसीचे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणूनच आम्ही ओबीसीचा नवीन पक्ष स्थापन करीत असल्याचे ओबीसी बहुजन पार्टी अध्यक्ष प्रकाश शेंडगे म्हणाले.
केवळ मतांसाठी आणि आपले पक्ष वाढविण्यासाठीच ओबीसीचा वापर केला गेला. राज्यात ओबीसी बहुजनांचे राज्य प्रस्थापित केल्याशिवाय शोषित, पिडीत, वंचित, दलित वर्गाला पर्याय नाही. राजसत्तेचा मार्ग अवलंबिल्याशिवाय देशात-राज्यात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व प्रस्थापित होणार नाही. याची खात्री झाल्याने ‘ओबीसी बहुजन पार्टी’ ची स्थापना करून त्याद्वारे राजकीय क्रांती करण्याचा निश्चय सर्व ओबीसी-बहुजनांनी केला आहे.
या पक्षामार्फत ओबीसी, भटके, विमुक्त, बलुतेदार-अलुतेदार विशेष मागासवर्गाचे मागासलेपण दूर करून त्यांच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी, त्यांच्यावरील दडपशाही आणि शोषणाविरुद्ध लढण्यासाठी समाज आणि सार्वजनिक जीवनात त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न राहिल.