मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन प्रकल्प सुरू करून देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:07 AM2021-09-21T04:07:26+5:302021-09-21T04:07:26+5:30
उच्च न्यायालयाची राज्य सरकारला तंबी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत ...
उच्च न्यायालयाची राज्य सरकारला तंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत विचारणा करत उच्च न्यायालयाने आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा डिसेंबरपर्यंत घेऊन लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. तसेच हे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन विकास प्रकल्पाला परवानगी देणार नाही, अशी तंबी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिली.
मुंबई - गोवा महामार्गावरून नियमित प्रवास करणारे प्रवासी व व्यवसायाने वकील असलेले ओवैस पेचकर यांनी न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. नागरिकांना आधी या महामार्गाचा फायदा घेऊ द्या. मग नवीन प्रकल्प सुरू करा. तसेच या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व खड्डे तीन आठवड्यांत बुजवा, असेही निर्देश न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारला दिले.
२०१८ पासून आतापर्यंत महामार्ग रुंदीकरणाचे थोडेच काम पूर्ण झाल्याचा दावा पेचकर यांनी याचिकेत केला आहे. महामार्ग रुंदीकरणाचे काम गेले कित्येक वर्षे सुरू आहे. मात्र, ते काम वेळेत पूर्ण न झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
जानेवारी २०१० पासून म्हणजेच महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत २,४४२ जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यावर न्यायालयाने राज्य सरकार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यात लक्ष देण्याचे निर्देश दिले. तसेच न्यायालयाने महामार्गाच्या कामासंदर्भातील प्रगती अहवाल डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले.