नवीन चतुर सापडला; पुण्यातील भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण कार्यलयात केली नोंदणी
By सचिन लुंगसे | Published: October 4, 2023 03:38 PM2023-10-04T15:38:31+5:302023-10-04T15:42:51+5:30
मुंबई : निसर्गातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेलया ‘आर्मगेडॉन रीडटेल-प्रोटोस्टिकटा आर्मगेडोनिया’ या नव्या डॅमसेलफ्लाय (चतुर) प्रजातीची ओळख एमआयटी - डब्ल्यूपीयू ...
मुंबई : निसर्गातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेलया ‘आर्मगेडॉन रीडटेल-प्रोटोस्टिकटा आर्मगेडोनिया’ या नव्या डॅमसेलफ्लाय (चतुर) प्रजातीची ओळख एमआयटी - डब्ल्यूपीयू (वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ) संशोधकांनी जगाला करून दिली आहे. युनायटेड स्टेट्स स्थित वर्ल्डवाइड ड्रॅगनफ्लाय असोसिएशनशी संलग्न प्रकाशन, ओडोनाटोलॉजीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये या प्रजातीचे दस्तऐवजीकरण केले गेले आहे. शिवाय भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण, पुणे कार्यालयात नोंदणी केली गेली आहे.
केरळच्या नैऋत्य घाटात ‘डॅमसेलफ्लाय’ च्या प्रजातीचा शोध लागला आहे. एमआयटी - डब्ल्यूपीयू येथील पर्यावरण अभ्यास विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पंकज कोपर्डे यांचे कौशल्य, एमआयटी - डब्ल्यूपीयूचे पीएचडी स्कॉलर अराजूष पायरा यांचे संशोधन, एमआयटी - डब्ल्यूपीयूमधील पर्यावरण विज्ञान विद्यार्थी अमेय देशपांडे यांचा उत्साह आणि केरळचे वन्यजीव छायाचित्रकार रेजी चंद्रन यांनी या मोहिमेच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे.
धोक्यात आलेले कीटक कायमचे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. आपण पर्यावरणीय संकटांच्या उंबरठ्यावर आहोत. हे रोखण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि वसुंधरेच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी शास्त्रज्ञ, पर्यावरण संरक्षक, धोरणकर्ते आणि सर्वसामान्य यांच्या प्रयत्नांची गरज आहे. - डॉ.पंकज कोपर्डे, प्रमुख संशोधक, आर्मगेडॉन रीडटेल शोध
पश्चिम घाटातील जंगले मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे झपाट्याने बदलत आहेत. आर्मागेडॉनचा रीडटेलचा शोध म्हणजे आपण संकटाचा सामना करत आहोत त्याचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व करते. उशीर होण्यापूर्वी आपल्याला उपाय करण्याची आवश्यकता आहे. - रेजी चंद्रन, वन्यजीव छायाचित्रकार
नवीन सापडेल्लाय प्रजातींचे वैशिष्ट्य-
- नवीन सापडलेल्या प्रजातींचे गडद तपकिरी ते काळ्या रंगाचे शरीर आणि गडद हिरवे - निळे डोळे आहेत.
- पोटाच्या आठ भागांपैकी अर्ध्या भागावर नाजूक फिकट निळ्या खुणा आहेत.
- अधिवासाची निवड प्राथमिक पर्वतीय प्रवाह आहे. तिथे दाट वृक्षछायेखाली त्यांची वाढ होते.