ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21- मध्य रेल्वे मार्गावरून विशेष करून ठाणे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. ठाणे स्टेशनवरची गर्दी लक्षात घेता एक नवं रेल्वे स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान लवकरच नवं रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. या दोन स्थानकादरम्यान नवं स्थानक व्हावं, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवासी करत आहेत. प्रवाशांची ही मागणी लक्षात घेता नवं स्टेशन उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेतं आहे. मध्य रेल्वेने या संबंधिचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मांडला असून आता रेल्वे मंत्रालयाच्या उत्तराच्या प्रतिक्षेत मध्य रेल्वे आहे. ठाणे-मुलुंडदरम्यान उभारण्यात येणार असलेल्या या स्टेशनचं नाव अजून निश्चित करण्यात आलं नाही. पण कोपरी पुलाजवळ हे स्टेशन असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक उपनगरीय मार्गावरचं सगळ्यात गर्दीचं स्थानक आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने हा प्रस्ताव ठेवला आहे. ठाणे-मुलुंडदरम्यानचं हे नवं स्थानक मध्य रेल्वेच्या मार्गावरील सत्त्यात्तरावं स्थानक असेल. उपनगरीय रेल्वेच्या निकषानुसार दोन्ही स्टेशनमधील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे.
"नव्या स्टेशनसंदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या तयारीत आम्ही आहोत", अशी माहिती मुंबई विभागाचे मध्य रेल्वे विभाग प्रमुख रविंदर गोएल यांनी मुंबई मिररला दिली आहे.
नुकतंच रेल्वे अभियंत्यांनी ठाण्याच्या या प्रकल्पाचं डिझाइन आणि जागा निश्चित करण्यासाठी जागेची पाहणी केली आहे.. ठाणे आणि मुलुंडच्या मध्यावर असलेल्या कोपरी पुलाची जागा या नव्या स्थानकासाठी निश्चित झाली आहे. या दोन्हीही स्थानकांमधील अंतर एक किलोमीटरपर्यंत असावं यासाठी कोपरी पुलाची जागा ठरविण्यात आली आहे. सध्या ठाणे आणि मुलुंड स्टेशनमधील अंतर 2.34 किमी आहे. गेल्या वर्षी रेल्वेकडून एक सर्व्है झाला होता. त्यावेळी ठाणे-मुलुंड दरम्यान आणखी एक स्टेशन असावं. अशी कल्पना सुचविण्यात आली होती. या नव्या स्टेशन परिसरात नागरीकांना गाडी पार्क करण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे.