महाराष्ट्रात नवं वसुली रॅकेट? भाजपा नेते मोहित कंबोज यांचा शिवसेना खा. संजय राऊतांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 10:51 AM2022-03-15T10:51:56+5:302022-03-15T10:52:58+5:30
राऊतांनी पत्रकार परिषदेत अर्धवट माहिती दिली. नवलानी यांच्या खात्यावर विविध कंपन्यांनी कोट्यवधीची रक्कम ट्रान्सफर केल्याचा दावा राऊतांनी केला होता. जर हे आरोप खरे असतील तर त्यांच्याविरोधात अँन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार करायला हवी अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.
मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र नवलानी आणि त्यांना पैसे देणाऱ्या कंपन्यांची नावं जाहीर केली होती. जवळपास १६० कोटींचा भ्रष्टाचार ईडीच्या अधिकाऱ्यांनी केल्याचा दावा केला होता. त्यावरून आता भाजपा नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पैसे देणे आणि घेणे हे गुन्हा असल्याने ज्या कंपन्यांनी पैसे दिले आणि ज्यांनी पैसे घेतले अशा दोघांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मोहित कंबोज म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सलीम-जावेद काल्पनिक कहानी लोकांसमोर आणत आहे. २८ फेब्रुवारीला शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. त्यात जितेंद्र नवलानी या व्यक्तीचा उल्लेख केला. गंभीर आरोप करत ईडीच्या तपास यंत्रणेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राऊतांनी पत्रकार परिषदेत अर्धवट माहिती दिली. नवलानी यांच्या खात्यावर विविध कंपन्यांनी कोट्यवधीची रक्कम ट्रान्सफर केल्याचा दावा राऊतांनी केला होता. जर हे आरोप खरे असतील तर त्यांच्याविरोधात अँन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार करायला हवी. ही मुंबई पोलिसांकडे चौकशी होणार नाही. देशात भ्रष्टाचारात लाच देणे आणि घेणे हे दोन्ही गुन्हा आहे. ज्या १६० कोटींचा भ्रष्टाचार लावण्यात आला आहे. त्यात ज्यांनी ही रक्कम दिली त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या कंपन्यांची नावं यात आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) March 15, 2022
तसेच मुंबई, महाराष्ट्रात सीबीआय चौकशी करण्यास निर्बंध लावले आहेत. लाच देणारे आणि घेणारे दोघांचीही चौकशी व्हायला हवी. संजय राऊतांनी पत्रामधून त्या कंपन्यांची नावं जाहीर केली आहेत. मोठमोठ्या लोकांची नावं जाहीर करून संजय राऊत खंडणीचं नवीन वसुली रॅकेट सुरू केलंय का? घाबरवून या लोकांकडून वसुली केली जाणार आहे का? इतके मोठे आरोप लावल्यानंतर राज्यसभा खासदारांनी सीबीआय चौकशीची मागणी का केली नाही? अधिकाऱ्यांना बदनाम करणं, केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप लावणं हे काम संजय राऊत करतायेत. जितेंद्र नवलानी ईडीचा फ्रंटमॅन असेल तर त्याचा पैसा कशारितीने ईडीकडे जातो याचे पुरावे द्यायला हवे होते. महाराष्ट्रात नव्या प्रकारचं वसुली रॅकेटची सुरुवात संजय राऊतांनी केली आहे असा आरोप भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला.
दरम्यान, संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात ज्या कंपन्यांनी पैसे दिले आणि ईडीच्या ज्या अज्ञात अधिकाऱ्यांवर आरोप लावले आहेत. या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राची सीबीआय चौकशी लावण्याचे आदेश द्यावेत. पत्रकार परिषदेत नुसते आरोप करून तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अन्यथा आम्ही हायकोर्टात जाऊ असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.