लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे घराचे नूतनीकरण तसेच इंटिरियरच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या हार्डवेअर, लाकूड, सिरॅमिक, मार्बल या वस्तूंची दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे शहरात घराच्या नूतनीकरणाची व इंटिरियरची कामे रखडल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील काही महिन्यांमध्ये मुंबईत घर खरेदीचे प्रमाण वाढले. मुद्रांक शुल्कात देण्यात आलेली सवलत तसेच आकर्षक व्याजदर यामुळे महिन्याला सरासरी दहा हजार घरांची खरेदी झाली. त्यात डिसेंबर महिन्यात १९ हजार व मार्च महिन्यात १७ हजार घरांची खरेदी नोंदविली गेली. घर खरेदीनंतर शहरात घराचे इंटेरियर तसेच नूतनीकरण मोठ्या प्रमाणात सुरू होते. मात्र या कामांसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. कामाच्या ठिकाणी या वस्तू नसल्याने शहरात बऱ्याच ठिकाणी नूतनीकरणाची व इंटिरिअरची कामे रखडली आहेत.
एखाद्या घराचे नूतनीकरण अथवा इंटिरिअरचे काम करताना त्या ठिकाणी दररोज विविध वस्तूंची गरज भासते. अशा वेळेस सकाळीच त्या दुकानांमधून आवश्यक वस्तू आणाव्या लागतात. मात्र पोलिसांच्या भीतीमुळे व्यापारी दुकाने उघडत नाहीत व वस्तू न मिळाल्यामुळे आम्हाला काम थांबावे लागते. असे इंटिरिअर डिझायनर केदार चौधरी यांचे म्हणणे आहे.
जानेवारी महिन्यात घरखरेदी केली होती. मागच्याच महिन्यात मला घराचा ताबा मिळाला. घराची पूजा करण्याअगोदर घराचे सर्व इंटिरिअर करून घेण्याचा विचार मनात आला. त्यानुसार आत्तापर्यंत इंटिरिअरचे ७० टक्के काम पूर्ण देखील झाले होते. येत्या गुढीपाडव्याला संपूर्ण काम संपवून मी घराची पूजा ठेवणार होतो. मात्र आता उर्वरित काम करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात न मिळाल्यामुळे काम थांबवावे लागत आहे. असे चेंबूर येथील रहिवासी सूर्यकांत मोकल यांनी सांगितले.