‘एससीएआय’ची माहिती; अनेकांचे रोजगार धोक्यात येण्याची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू झालेल्या नव्या निर्बंधांमुळे मॉल आणि शॉपिंग सेंटरच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे. यातून मार्ग न काढल्यास अनेकांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती शॉपिंग सेंटर असोसिएशनने (एससीएआय) व्यक्त केली.
कोरोनापूर्व काळात या क्षेत्रातील मासिक उलाढाल १५ हजार कोटींहून अधिक होती. मात्र, पहिल्या लॉकडाऊनच्या काळात ती जवळपास ९० टक्क्यांपर्यंत घसरली. निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर व्यवसायाला गती मिळू लागली. मार्च २०२१ पर्यंत व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. शिवाय ग्राहकसंख्याही कोविडपूर्व काळाच्या तुलनेत जवळपास ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने स्थानिक आणि राज्य पातळीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले. त्याचा विपरीत परिणाम होऊन गेल्या काही दिवसांत मॉल्सच्या उत्पन्नात जवळपास ५० टक्क्यांची घट झाल्याचे एससीएआयने म्हटले आहे.
* १२ दशलक्ष कामगारांचे भवितव्य टांगणीला
- मॉल्सचे अर्थचक्र थांबल्यामुळे अनेक कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती एससीएआयने व्यक्त केली. शॉपिंग सेंटर उद्योगावर देशभरात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जवळपास १२ दशलक्ष कामगार आणि मजूर अवलंबून आहेत. त्यातील ८० टक्के कामगार हे अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत.
- पहिल्या लॉकडाऊनच्या काळात २५ ते ३० टक्के कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. पण मार्च २०२१ पर्यंत त्यातील ७५ टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आता पुन्हा कठोर निर्बंधांमुळे अर्थचक्र थांबल्याने इतक्या कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यायचे, हा प्रश्न व्यावसायिकांना सतावू लागला आहे.
- या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने शॉपिंग सेंटर क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या आधार द्यावा, तसेच लवकरात लवकर मॉल्स खुले करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एससीएआयने केली आहे.
---------------------