स्ट्रीट लॅबच्या माध्यमातून समजावून घेता येणार रस्त्यांची नवीन आरेखने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 03:27 AM2019-12-24T03:27:49+5:302019-12-24T03:28:13+5:30
वरळीत खुले प्रदर्शन : महापालिकेच्या अभियांत्रिकीय संकुलात आयोजन
मुंबई : महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्ट्रीट लॅबच्या माध्यमातून रस्ते आरेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आरेखनांचे खुले व विनामूल्य प्रदर्शन २३ डिसेंबरपासून वरळी येथील महापालिकेच्या अभियांत्रिकीय संकुलात आयोजित करण्यात आले आहे. २४ डिसेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू राहील. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत खुल्या प्रदर्शनात रस्ता आरेखने बघण्याची व ते समजावून घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध आहे.
रस्त्यांची आरेखने तयार करणे, सुधारित करणे इत्यादी कामे यापूर्वी महापालिकेच्या अंतर्गत स्तरावर करण्यात येत असत. तथापि, याबाबत प्रवीणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार यंदा प्रथमच रस्ते आरेखनांसाठी खुली स्पर्धा आयोजित करण्यात येऊन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून महापालिका क्षेत्रातील पाच रस्त्यांची आरेखने प्रवेशिका स्वरूपात आमंत्रित करण्यात आली होती. यामध्ये दक्षिण मुंबईतील लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग, राजा राममोहन रॉय मार्ग व मौलाना शौकत अली मार्ग; पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्क साईट मार्ग क्रमांक १७ आणि पश्चिम उपनगरातील पी दक्षिण विभागातील स्वामी विवेकानंद मार्ग या पाच रस्त्यांच्या किंवा त्यांच्या काही भागांचा समावेश आहे.
५२ जणांचा सहभाग!
स्पर्धेत ५२ व्यक्ती / संस्थांनी भाग घेतला होता. यापैकी १५ आरेखनांची निवड सादरीकरणासाठी समितीद्वारे करण्यात आली. तर सादरीकरणानंतर ५ विजेत्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रसन्न देसाई आर्किटेक्ट, स्टुडियो पोमेग्रेनेट, स्टुडियो इनफील अॅण्ड डिझाईन शाळा, मेड इन मुंबई आणि वांद्रे कलेक्टिव्ह रिसर्च अॅण्ड डिझाईन फाउंडेशन यांचा समावेश आहे. हे विजेते आता महापालिका, ब्लूमबर्ग फाउंडेशन व डब्ल्यू.आर.आय. इंडिया यांच्यासोबत आरेखनांनुसार रस्त्यांबाबत योग्य ते बदल प्रत्यक्षात आणण्याचे कार्य करणार आहेत.
प्रदर्शनास भेट देणाऱ्या मुंबईकरांना रस्ता आरेखनाची माहिती देताना स्पर्धेमध्ये सहभागी झालेले स्पर्धक.