मुंबई : सोन्याच्या तस्करीसाठी तस्करांनी आता ईशान्येकडील राज्यांकडे मोर्चा वळवला आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने अलीकडेच केलेल्या ११ कारवायांतून हे अधोरेखित झाले आहे. सप्टेंबरमध्ये म्यानमार आणि बांग्लादेश येथून ईशान्येकडील राज्यांच्या मार्गाने भारतात तस्करीचे सोने पाठवले गेले. आतापर्यंत १२१ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
आजवर समुद्र वा विमानमार्गे मोठ्या प्रमाणावर सोने भारतामध्ये येत होते. त्या मार्गांवर होणाऱ्या सोने तस्करीला पायबंद घालण्यात विविध तपास यंत्रणांना यश आले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून भारतामध्ये येत असलेले सोने ईशान्येकडील राज्यांतून येत असल्याचे प्रकार उघडकीस आले. तस्करी झालेले हे सोने प्रामुख्याने मुंबई, दिल्ली आणि पाटणा या शहरांत पोहोचले होते.
सर्वात मोठी कारवाई मुंबईत
केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने केलेल्या ११ कारवायांपैकी सर्वात मोठी कारवाई मुंबईत केली. मुंबईत सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पडकण्यात आलेले सोने हे ईशान्येकडील एका राज्यातून कुरिअरद्वारे मुंबईत आले होते. कुरिअरद्वारे सोन्याची तस्करी पहिल्यांदाच झाल्याचे पाहून तपास अधिकारीही चक्रावले होते.
कुरिअरद्वारे ३३ कोटी ४० लाख रुपये किमतीचे ६५ किलो सोने मुंबई आणि परिसरात आले होते. तर, दुसऱ्या प्रकरणात गोण्यांमध्ये काही माल आला होता. त्यात ११ कोटी ६५ लाख रुपये मूल्याचे २३ किलो सोने आढळले होते. अन्य ९ कारवायांच्या माध्यमातून ३३ किलो सोने पकडण्यात आले होते. सोने तस्करीच्या या नव्या मार्गाचा केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने पर्दाफाश केला आहे. तसेच देशाच्या विविध भागांत असलेल्या विभागीय कार्यालयांशी समन्वय करून आता कारवाई सुरू केली आहे.