मनोहर कुंभेजकर मुंबई : भारतीय बँकिंग सिस्टीम कठीण काळातून जात आहे. बँकिंग क्षेत्रात अनेक खाती एनपीए (नॉन परफॉर्मिंग अकाऊंट) जमा होत आहेत़ पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या नावाने नुकतीच झालेल्या बँक घोटाळ्याची माहिती उघडकीस आल्यापासून बँकांनी त्यांचा व्यवसाय कसा करावा यासाठी कठोर कारवाई आणि मार्गदर्शक सूचना आरबीआय आणि सरकारने तयार केल्या आहेत.अशा प्रकारचे बँकिंग नियम व मार्गदर्शक तत्त्वे फक्त शहरी सहकारी बँकांसाठीच लागू केली जाऊ नयेत, तर संपूर्ण बँकिंग समुदायासाठी लागू केली जावी. खासगी बँका तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनासुद्धा आरबीआयने शासन नियम कठोर केले पाहिजेत, अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना एका पत्राद्वारे केली आहे.पीएमसी बँक ही थकीत कर्जदारांच्या खातेदारांची देणी देण्यासाठी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. या लिलावात पारदर्शकता येण्यासाठी पीएमसी बँकेच्या सर्व खातेदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या समोरच लिलावाची पारदर्शक प्रक्रिया पार पडली पाहिजे. कारण अनेक वेळा बँकेच्या मालमत्तेचा लिलाव करताना बँकेचे अधिकारी आणि खरेदीदार यांच्यात संगनमत होते व बँकेच्या मालमत्तेचा लिलाव होतो. त्यामुळे साहजिकच बँकेचे २५ ते ५० टक्के नुकसान होते. परिणामी खातेदारांचे मोठे आर्थिक नुकसान होते.रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था आहे. बँकिंग प्रणालीवर बारीक नजर ठेवून बँकेच्या खातेदारांचे व ठेवीदारांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सरकारी तसेच निम्न सरकारी बँकांच्या कारभारावर लक्ष ठेवून आर्थिक शिस्त लावण्यासाठी नियम व नियमावली तयार करण्याचे महत्त्वाचे काम रिझर्व्ह बँकेने करायला हवे. तसेच त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे, अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली.आरबीआय आधीपासूनच बँकिंग क्षेत्राच्या ग्राउंड परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असून प्रत्येक बँकेच्या ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना व पावले नक्कीच उचलतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने अलीकडेच प्रणालीतील जोखीम कमी करण्यासाठी नवीन नियम करविण्याचा निर्णय घेतला आहे व लवकरच नागरी सहकारी बँकांसाठी पॉलिसी जाहीर केली जाईल.मुळात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहारात दिलेली कर्जे लपवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात बनावट खाती उघडली होती, अशी माहिती प्रसिद्धिमाध्यमांनी दिली होती, असे शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.
नवे नियम सर्व बँकिंग समुदायासाठी लागू करा- गोपाळ शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 1:10 AM