Join us

घरीच काेराेना चाचणीसाठी नवी नियमावली; औषध विक्रेत्यांना किटच्या नोंदी ठेवण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 7:50 AM

चाचणीचे किट वापरावर वॉर रूमचे नियंत्रण

मुंबई :  कोविड आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल येण्यास विलंब होत असल्याने घरच्या घरी किट आणून चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र या किटची माहिती संबंधितांकडून पालिकेला कळवली जात नसल्याने बाधित रुग्णांची नोंद होण्यात अडचण येत आहे. परिणामी संसर्गाचा धोका वाढत असल्याने महापालिकेने नवी नियमावली तयार करीत उत्पादक, औषध विक्रेते, दवाखाने, अन्न व औषध प्रशासन आणि पालिका वॉर रूमवर याची नोंद ठेवण्याची जबाबदारी सोपविली आहे. 

गेल्या दहा दिवसांमध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे ९८ हजार होम टेस्ट किटची नोंद झाली आहे. मात्र प्रत्यक्षात तीन लाखांहून अधिक किट विकण्यात आल्याने बहुतांश नागरिक आपला चाचणी अहवाल मोबाईल ॲपद्वारे कळवत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने शुक्रवारी नवी नियमावली जाहीर करीत यावर नियंत्रण आणण्याचा निर्धार केला आहे. 

अशी आहे नियमावली....

  • सेल्फ टेस्ट किटचे सर्व उत्पादक, वितरक यांनी केमिस्ट, औषध विक्रेते, दवाखाने यांना विक्री केलेल्या एकूण किटची नियमित माहिती अन्न व औषध प्रशासन आणि पालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाला ई-मेलद्वारे कळवावी.
  • केमिस्ट, औषध विक्रेत्यांनी सेल्फ टेस्ट किट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल देऊन त्यांची नोंद ठेवणे, ही माहिती दररोज सायंकाळी सहा वाजता ई-मेलद्वारे अन्न व औषध प्रशासन तसेच पालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाला कळविणे.
  • अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत विक्री होणाऱ्या सेल्फ टेस्ट किटवर नियंत्रण ठेवणे. तसेच किट खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी त्याबाबतची माहिती ॲपवर अपडेट करावी, याची जाणीव केमिस्टमार्फत करून देणे.
  • उत्पादक, वितरक आणि केमिस्ट यांच्याकडून दररोज येणाऱ्या माहितीची छाननी करून संबंधित विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवणे. तसेच किट खरेदी करणारा ग्राहक त्याबाबतची माहिती ॲपवर कळविण्याची खातरजमा करण्याची जबाबदारी पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्ष आणि पालिका वॉर्ड वॉर रूमवर असणार आहे. तसेच बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही या कक्षावर असणार आहे.

कोविड चाचणीत घट

गेल्या काही दिवसांमध्ये महापालिकेने कोविड चाचणीचे प्रमाण वाढवले होते. त्यामुळे एका दिवसात ७२ हजार चाचण्यादेखील करण्यात आल्या होत्या. मात्र शुक्रवारी चाचण्यांचे प्रमाण ५४,९२४ एवढे होते. आतापर्यंत एकूण एक कोटी ४५ लाख १० हजार ४३८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर १.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे, 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका