पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक आॅक्टोबरपासून
By Admin | Published: July 21, 2015 04:07 AM2015-07-21T04:07:03+5:302015-07-21T04:07:03+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल सेवेचे नवीन वेळापत्रक १ आॅक्टोबरपासून लागू होणार आहे. या वेळापत्रकात जादा लोकल फेऱ्या मिळण्याची शक्यता
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल सेवेचे नवीन वेळापत्रक १ आॅक्टोबरपासून लागू होणार आहे. या वेळापत्रकात जादा लोकल फेऱ्या मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र पंधरा डबा लोकलची संख्या वाढवण्याचा विचार पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू मार्गावर सध्या ९0 लोकल असून त्याच्या १,३0५ फेऱ्या होतात. मात्र लोकलची संख्या आणि त्यांच्या फेऱ्या पाहता त्या अपुऱ्याच पडत आहेत. या मार्गावर दररोज ३७ ते ३८ लाख प्रवासी प्रवास करत असून सध्या या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. बोरीवली ते विरार या पट्ट्यात तर प्रवाशांची संख्या सर्वाधिक असून गर्दीच्या वेळेत या स्थानकांदरम्यान असलेल्या अन्य स्थानकांवर उतरणे किंवा चढणेही कठीण होऊन बसते.
सकाळी साडेआठ ते सकाळी साडेदहा या गर्दीच्या वेळेत पश्चिम रेल्वेवर ९९ तर संध्याकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत ८९ फेऱ्या होतात. बाकी फेऱ्या या अन्य वेळेत होत असून हे पाहता त्या कमीच पडत असल्याचे सांगण्यात आले. दोन आर्थिक वर्षांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. २0१३-१४ मध्ये १४३ कोटी १0 लाख तर २0१४-१५ मध्ये १४४ कोटी १0 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. हे पाहता १ कोटी प्रवाशांची त्यात भर पडली आहे.
नवीन वेळापत्रकात प्रवाशांना जास्त लोकल फेऱ्या मिळतील, अशी अपेक्षा आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर २0१३ च्या एप्रिल महिन्यात नवीन वेळापत्रक लागू झाले होते. त्यात काही नवीन फेऱ्या देण्यात आल्या होत्या. आता दोन वर्षे उलटली तरी नवीन वेळापत्रकाबाबत विचार करण्यात आला नव्हता. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांना विचारले असता, नवे वेळापत्रक आॅक्टोबर महिन्यापासून लागू होईल, अशी माहिती दिली. त्यात जादा लोकल फेऱ्यांचा विचार केलेला नसल्याचे ते म्हणाले. पंधरा डबा लोकल वाढवणार का, असे विचारले असता त्याचा विचार केला जात असल्याचे शैलेंद्र कुमार यांनी सांगितले.
सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर बारा डबा लोकलव्यतिरिक्त दोन पंधरा डबा लोकलही धावत आहेत. यात आणखी पंधरा डबा लोकलची भर पडणार असून त्यावर काम सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वे मार्गावर सीमेन्स कंपनीच्या लोकल धावत असून यात नुकतीच दोन बम्बार्डियर लोकलची भर पडली आहे. तर आणखी एक बम्बार्डियर लोकल येत्या आठवड्यात येत आहे.
एमआरव्हीसीमार्फत एमयूटीपी-२ अंतर्गत या बम्बार्डियर लोकल येत आहेत. या तीन बम्बार्डियर लोकल सोडल्यास आणखी ६९ नव्या लोकल येतील.
या सर्व लोकल पश्चिम रेल्वेवर चालवण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. मध्य रेल्वेवर या लोकल नको, असे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी आधीच सांगितले आहे. सर्व नव्या लोकल प.रे.वर चालवून त्याऐवजी प.रे.वरील तेवढ्याच सीमेन्स लोकल मध्य रेल्वेला देण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि ही मागणी रेल्वे बोर्डाकडून मान्यही झाल्याचे सांगण्यात येते.
(प्रतिनिधी)