- जितेंद्र कालेकर, ठाणेअगदी १५ दिवसांपूर्वीच ‘वेगा आर्किड’ या गृहसंकुलाच्या सुरक्षेसाठी ‘नॅशनल सिक्युरिटी’मार्फत कामावर रूजू झालेल्या सुरक्षारक्षकानेच आपल्या काही साथीदारांच्या मदतीने ‘लीलाज ज्वेलर्स’ फोडून अडीच लाखांची रोकड आणि अडीच कोटींचा ऐवज लुबाडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या टोळीला शोधण्यासाठी पोलिसांनी चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मूळ झारखंडच्या असलेल्या या सुरक्षारक्षकाने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. हजेरीची नोटबुकही फाडली आहे. तपासात दुकानाच्या मागच्या सोसायटीतील सुरक्षारक्षक पसार झाल्याचे आढळले. त्याचे रेखाचित्रही पोलिसांनी जारी केले आहे. दुकानाचे मालक कमलेश जैन हे मंगळवारी राजस्थानला गेले होते. चोरट्यांनी दुकानात शिरण्यापूर्वीच वेगा आर्किड सोसायटीच्या सीसीटीव्हीचे डीव्हीआरही चोरले. दुकानात आठ सीसीटीव्ही कॅमेरे असूनही उपयोग झाला नाही. या दुकानाचा विमा उतरवण्यात आला आहे.३५ लाखांचा ऐवजघटनास्थळी चार व्यावसायिक वापराचे सिलिंडर, गॅसकटर, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर पोलिसांना मिळाले. चोरट्यांनी दोन लाख ६० हजारांची रोकड, ३१ लाख ७० हजारांची ६२ किलो चांदी, चार किलो ४८० ग्रॅम वजनाचे एक कोटी १२ लाखांचे सोने आणि ८९ लाख ६० हजारांचे हिरे असा दोन कोटी ३५ लाखांचा ऐवज लुबाडल्याचे राजकुमार लोढा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नव्या सुरक्षारक्षकानेच लुटले सराफा दुकान
By admin | Published: December 18, 2015 1:13 AM