Join us

मुंबईत वरळीतील स्मशानभूमीतून आता थेट परदेशातही अंत्यदर्शन घेता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 9:46 PM

मुंबईत वरळी येथे महापालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक स्मशानभूमी तयार करण्यात येणार

मुंबईत वरळी येथे महापालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक स्मशानभूमी तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी आठ विद्युतदाहिन्या, प्रार्थनास्थळ आणि ‘नक्षत्र उद्यान’ विकसित केले जाणार आहे. तसेच या स्मशानभूमीतील अंत्यदर्शन परदेशातूनही पाहता येईल, अशी सुविधा महापालिकेने उपलब्ध केली आहे. अशा प्रकारचे नियोजन असणारी ही महापालिकेची पहिलीच स्मशानभूमी असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

वरळीतील स्मशानभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील भागोजी कीर स्मशानभूमीच्या नुतनीकरणाची पाहणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी केली. पालिकेच्या या दोन्ही स्मशानभूमींच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू आहे. यापैकी वरळी येथील पालिकेच्या रमाई आंबेडकर स्मशानभूमीच्या साडेनऊ एकर जागेमध्ये अंत्यदर्शनासाठी येणार्‍या नागरिकांना अद्ययावत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

असे होणार अंत्यदर्शन...रमाई आंबेडकर स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यदर्शनाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. याची लिंक पालिकेच्या पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. यामुळे परदेशात किंवा दूरच्या ठिकाणी राहत असणारे आणि अंत्यदर्शनाला येऊ न शकणार्‍या नातेवाईकांना  ऑनलाइन अंत्यदर्शन घेता येणार  आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. 

अशा आहेत अन्य सुविधा...या ठिकाणी रुंद रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता अशा सुविधा देण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. 

भागोजी कीर स्मशानभूमीचे नूतनीकरणछत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असणार्‍या भागोजी कीर यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. या स्मशान भूमी बरोबरच लगतच्या चैत्यभूमीच्या परिसराची पाहणी करून हा परिसर सुशोभित करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित पालिका अधिकार्‍यांना दिले. तसेच या स्मशानभूमीसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून अंतर्गत सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 

टॅग्स :मुंबईवरळीकिशोरी पेडणेकरमुंबई महानगरपालिका