मुंबईच्या समुद्रात मिळाले तेल व वायूचे नवे साठे! ओएनजीसीचे यश, २९ दशलक्ष टन उत्पादन शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 05:39 AM2018-01-02T05:39:14+5:302018-01-02T11:35:33+5:30
मुंबईजवळ अरबी समुद्रात असलेल्या सध्याच्या ‘मुंबई हाय तेलक्षेत्रा’च्या पश्चिमेस खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या आणखी ब-याच मोठ्या साठ्यांचा शोध घेण्यात ‘आॅईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’ (ओएनजीसी) या अग्रगण्य सरकारी तेल कंपनीस यश आले आहे.
नवी दिल्ली : मुंबईजवळ अरबी समुद्रात असलेल्या सध्याच्या ‘मुंबई हाय तेलक्षेत्रा’च्या पश्चिमेस खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या आणखी बºयाच मोठ्या साठ्यांचा शोध घेण्यात ‘आॅईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’ (ओएनजीसी) या अग्रगण्य सरकारी तेल कंपनीस यश आले आहे. हे नवे साठे येत्या दोन वर्षांत विकसित करून तेथून सुमारे ३० दशलक्ष टन तेल व तेवढ्याच वायूचे उत्पादन करणे शक्य होऊ शकेल.
नवर्षारंभानिमित्त संसदेस सोमवारी ऐनवेळी सुटी जाहीर केली गेली. तरी आजच्या कामकाजात नमूद असलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेली ही शुभवार्ता लोकसभेच्या वेबसाइटवरून प्रसिद्ध करण्यात आली.
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री प्रधान यांनी सांगितले की, सध्या जेथून उत्पादन घेतले जाते त्या ‘मुंबई हाय तेलक्षेत्रा’च्या पश्चिमेस खोदलेल्या ‘डब्ल्यूओ-२४-३’ या विहिरीने या नव्या साठ्यांचा शोध लागला. खोदकामाच्या वेळी जी काही माहिती मिळत गेली त्याआधारे नऊ ठिकाणे/ क्षेत्रे ठरविली गेली व या सर्व ठिकाणी चाचणी खोदणी केली असता त्या सर्व ठिकाणांतून तेल/वायू प्रवाहित झाला.
शोध लागलेल्या या नव्या ठिकाणी २९.७४ दशलक्ष टन एवढे तेल व वायू असावा, असे संकेत मिळाले आहेत, असे नमूद करून पेट्रोलियमंत्र्यांनी असेही सांगितले की, निश्चित केलेल्या क्षेत्रातील नवव्या ठिकाणी तपासणीसाठी खोदकाम केले असता तेथून दिवसाला ३,३१० बॅरल तेल व १७,०७१ घनमीटर एवढा वायू प्रवाहित होत असल्याचे आढळून आले. हे साठे अनेक स्तरांवर असून त्यांचा आणखी शोध घेऊन उत्पादन करण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
‘ओएनजीसी’ने या नव्या शोधाची माहिती हायड्रोकार्बन महासंचालकांना
दिली असून या साठ्यांची अधिक विश्वसनीय माहिती गोळा केली जात
आहे. निधी व तांत्रिक सज्जता वेळेत
झाली तर या नव्या साठ्यांचा विकास करून तेथून येत्या दोन वर्षांत उत्पादन सुरू केले जाऊ शकेल.
‘ओएनजीसी’ने ‘मुंबई हाय’मध्ये तेल उत्पादन सुरू केल्यानंतर ५० हून अधिक वर्षांनंतर हे नवे साठे सापडले आहेत. त्यामुळे या तेलक्षेत्रातील उत्पादन आधीच्या अपेक्षेहून अधिक काळ सुरू ठेवता येऊ शकेल.
भारतासाठी सुवार्ता
‘मुंबई हाय’चे
महत्त्व द्विगुणित
देशातील सर्वात
मोठे तेलक्षेत्र
सध्याचे वार्षिक
उत्पादन १० दशलक्ष टन
याखेरीज अरबी समुद्रात इतरही छोटी तेलक्षेत्रे
त्या सर्वांचे मिळून वार्षिक उत्पादन १६ दशलक्ष टन
देशाच्या एकूण तेल उत्पादनापैकी ४४% येथून