मुंबई : वरळी नाका येथे वाहतूक विभागाने नवीन सिग्नल यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे वरळी नाका ते लोअर परळ या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी वरळी नाका-करी रोड शेअर टॅक्सी चालक-मालक संघटनेने येथील नवा सिग्नल बंद करण्याची मागणी केली आहे. या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची पार्किंगही केली जाते. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
वरळी नाक्यावरील सिग्नल सुरू करण्यासाठी वाहतूक मुख्यालयातून आदेश आले आहेत. त्यामुळे महालक्ष्मी स्थानकाकडे जाणारा मार्ग खुला करून येथे सिग्नल बसविण्यात आला आहे. हा सिग्नल फक्त पंधरा सेकंदांचा आहे. लोअर परळ येथील पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला असून हा सिग्नल सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती एका वाहतूक पोलिसाने गोपनीयतेच्या अटीवर दिली.
गणपतराव कदम मार्गावर वारंवार होत असलेल्या वाहतूककोंडीचे कारण देत वरळी नाका येथे नवा सिग्नल सुरू करण्यात आला आहे. वाहतूककोंडीमुळे आता शेअर टॅक्सी व्यवसायावरही गदा आली आहे. कोंडीमुळे व्यवसाय निम्म्याने घटला आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी दोन टॅक्सी चालकांना रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. वाहतूक विभागाने त्वरित नवा सिग्नल बंद करावा, अशी मागणी वरळी नाका-करी रोड शेअर टॅक्सी चालक-मालक संघटनेचे सचिव सुबोध मोरे यांनी केली.