मुंबई : मुंबईतील स्कायवॉक बंद केले जात असताना, बोरीवली रेल्वे स्थानक पूर्व ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत नव्याने स्कायवॉक बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. बोरीवली रेल्वे स्थानकावरून ओंकारेश्वर मंदिराजवळील मेट्रो रेल्वे स्थानकाला हा स्कायवॉक जोडला जाणार आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेचे प्रवासी आणि राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या पर्यटकांना या स्कायवॉकचा वापर करता येणार आहे.
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने पहिला स्कायवॉक २००७ मध्ये वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कलानगर सिग्नलपर्यंत बांधला. त्यानंतर, मुंबईतील अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधण्यात आला. मात्र, एमएमआरडीएने हे स्कायवॉक दोन वर्षांपूर्वी महापालिकेला देखभालीसाठी हस्तांतरित केले, पण यातील काही स्कायवॉक अनेक कारणांमुळे बंद करण्यात आले, पण आता मेट्रो रेल्वे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी बोरीवली पूर्व येथे स्कायवॉक बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
यासाठी एपीआय सिव्हिलकॉन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या स्कायवॉकसाठी तब्बल ९१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या स्कायवॉकचा फायदा बोरीवली पूर्व रेल्वे स्थानक व प्रादेशिक परिवहन आगारातील प्रवासी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणारे पर्यटक, शाळा व व्यावसायिक कार्यालयीन कर्मचारी यांना होणार आहे.
* या स्कायवॉकची लांबी १४७१.२१ मीटर असून, रुंदी ३.७५ मीटर इतकी आहे.
* मेट्रो, बोरीवली स्थानक, तसेच नॅशनल पार्कला हा स्कायवॉक जोडला जाणार असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.