मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ने लागू केलेल्या नव्या लघुसंदेश नियमावलीमुळे (एसएमएस रेग्युलेशन) ग्राहकांना लसीकरण, बँकिंग व्यवहार किंवा अन्य महत्त्वाच्या कामांसाठी ‘ओटीपी’ मिळण्यात अडचणी येऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे या नियमावलीला सात दिवसांची स्थगिती देण्यात आली. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठीच ती लागू करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी ‘ट्राय’ने दिले आहे.
या नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे संबंधितांनी (बल्क मेसेज पाठविणाऱ्यांनी) सात दिवसांच्या आत आपल्या यंत्रणेत तांत्रिक सुधार करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांचे लघुसंदेश ग्राहकांपर्यंत पोहोचणार नसल्याचे ‘ट्राय’ने म्हटले आहे.
एखाद्या दूरसंचार आस्थापनाकडून ‘बल्क मेसेज’ची योजना (एकाचवेळी अनेकांना लघुसंदेश पाठविता येणे) विकत घेणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. ग्राहकांना एखादे आमिष दाखविणारी लिंक पाठवून त्याद्वारे फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘ट्राय’ने ही नियमावली लागू करण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. प्रत्यक्षात अंमलबजावणी ८ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात आली.
नव्या लघुसंदेश नियमावलीमुळे महत्त्वाच्या कामांचे ‘ओटीपी’ मिळणेही बंद झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यामुळे ही योजना सात दिवसांकरिता स्थगित करण्याचा निर्णय ९ मार्च रोजी घेण्यात आला. या मुदतीत संबंधितांनी आपल्या यंत्रणेत तांत्रिक सुधार न केल्यास त्यांनी पाठविलेले लघुसंदेश ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाहीत, असेही ‘ट्राय’ने स्पष्ट केले आहे.
---------------------
फायदा काय?
- नव्या लघुसंदेश नियमानुसार, ‘बल्क मेसेज’ पाठविल्यास त्यातील मजकुराची छाननी केल्यानंतरच तो ग्राहकापर्यंत पोहोचविला जाईल.
- त्यामुळे गैरहेतूने किंवा आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी पाठविलेला संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच ‘ट्राय’च्या नजरेत येईल.
- असा मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचणार नसल्यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा बसेल.