Join us

जानेवारीत मराठी सिनेमांची नवी सुरुवात; या आठवड्यात प्रदर्शित होणार चार मराठी सिनेमे; हिंदी एकही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 4:15 PM

सोमवारपासून ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर'चा व्यवसाय घसरत असल्याचा फायदा मराठी सिनेमांना होण्याची शक्यता आहे.

मुंबई - मराठी सिनेसृष्टीने जानेवारीमध्ये नवीन सुरुवात करत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट रसिकांसमोर सादर केले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चार नवीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सोमवारपासून ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर'चा व्यवसाय घसरत असल्याचा फायदा मराठी सिनेमांना होण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये 'अॅनिमल', 'सालार' आणि 'डंकी' हे तीन मोठे सिनेमे रिलीज झाल्याने इतर हिंदी सिनेमांसह मराठी चित्रपटांनीही थोडा ब्रेक घेणेच पसंत केले. तीनही सिनेमांनी बाॅक्स आॅफिसवर कोट्यवधींचा बिझनेस केला आहे. अशा परिस्थिती इतर चित्रपटांना सिनेमागृहे मिळणेही कठीण झाले असते. या तीन चित्रपटांमुळे थांबलेले काही मराठी सिनेमे जानेवारीमध्ये रिलीज झाले. नाना पाटेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या 'ओले आले' या चित्रपटासह माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला 'पंचक' आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारलेला 'सत्यशोधक' असे तीन मोठे मराठी सिनेमे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झाले. यापैकी 'पंचक'ने थोडा फार चांगला व्यवसाय करण्यात यश मिळवले. त्यानंतर 'खुर्ची', '८ दोन ७५', 'आयच्या गावात मराठी बोल', 'नवरदेव बीएससी अॅग्री', 'सापळा' हे चित्रपट आले. यापैकी एकही चित्रपट तिकिटबारीवर गर्दी खेचू शकला नाही.

मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'फायटर'मुळे या शुक्रवारी कोणताही मोठा हिंदी सिनेमा रिलीज होणार नाही. याउलट मराठीत मात्र 'श्रीदेवी प्रसन्न', 'सूर लागू दे', 'मुसाफिरा', 'छत्रपती संभाजी' हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 'श्रीदेवी प्रसन्न'मध्ये सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही जोडी आहे. 'सूर लागू दे' हा विक्रम गोखले यांचा शेवटचा सिनेमा आहे. 'मुसाफिरा'चे दिग्दर्शन पुष्कर जोगने केले असून, त्याच्यासोबत यात पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी आदी कलाकार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित-दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी'मध्ये रजित कपूर, प्रमोद पवार, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के, कै. आनंद अभ्यंकर आदी कलाकार आहेत.

एका आठवड्यात चार मराठी सिनेमांची गर्दी झाल्याने सिनेमागृहे आणि प्राईम टाईम शोचा मुद्दा पुन्हा समोर येणार आहे. अशा वेळी प्रेक्षकांची विभागणी होऊन सर्वच चित्रपटांना फटका बसतो. अशी परिस्थिती उद्भवल्यास प्रेक्षक पॅाप्युलर स्टार असलेल्या चित्रपटांना प्राधान्य देत असल्याचे चित्रपट जाणकारांचे म्हणणे आहे. या आठवड्यात मात्र असे चार चित्रपट रिलीज होणार असल्याने प्रेक्षकांचा कौल कोणाला मिळतो ते पाहायचे आहे. 

टॅग्स :मराठी चित्रपटमुंबई