...कारण विचारताच अनिल देशमुखांना चौकशीसाठी नवे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 09:47 AM2021-06-27T09:47:34+5:302021-06-27T09:48:19+5:30

ईडीने देशमुख यांना दुसरे समन्स पाठवून येत्या मंगळवारी कार्यालयात हजर होण्याची सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने अटक केलेल्या देशमुख यांचे  खासगी स्वीय  सचिव  संजीव पालांडे व  खासगी सहायक कुंदन शिंदे यांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी मिळाली आहे.

New summons to Anil Deshmukh for questioning to ED | ...कारण विचारताच अनिल देशमुखांना चौकशीसाठी नवे समन्स

...कारण विचारताच अनिल देशमुखांना चौकशीसाठी नवे समन्स

Next

मुंबई : भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपावरून गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी आक्रमक भूमिका घेत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. ज्या कारणासाठी चौकशी करायची आहे, ते कळविल्यास त्यासंबंधी कागदपत्रांनिशी उपस्थित राहण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. आपल्या वकिलामार्फत त्यांनी ही भूमिका कळवली. 

दरम्यान, ईडीने देशमुख यांना दुसरे समन्स पाठवून येत्या मंगळवारी कार्यालयात हजर होण्याची सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने अटक केलेल्या देशमुख यांचे  खासगी स्वीय  सचिव  संजीव पालांडे व  खासगी सहायक कुंदन शिंदे यांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी मिळाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली होती. देशमुख यांनी मुंबईतील  बारमालकांकडून दरमहा १०० कोटींचा हप्ता वसुलीचे टार्गेट तत्कालीन एपीआय सचिन वाझेला दिले होते, असा आराेप मुंबईचे  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर त्याबाबत सीबीआय व ईडीने चौकशी सुरू केली. शुक्रवारी ईडीने  मुंबई, नागपूर येथील देशमुख यांच्या निवासस्थानी छापे टाकून मुंबईत जवळपास आठ तास त्यांची चौकशी केली. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहाण्याची सूचना केली होती.

देशमुख यांनी मात्र शनिवारी कार्यालयात जाणे टाळले. त्यांचे वकील जयवंत पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह साडेअकराच्या सुमारास बेलार्ड पियार्ड येथील ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना समन्सचे उत्तर देताना आपल्या अशिलाकडे  कोणत्या विषयासंबंधी चौकशी करायची आहे, त्यासंबंधी कसलाही उल्लेख नाही, तो कळवावा, त्यानुसार संबंधित कागदपत्रे घेऊन त्यांना उपस्थित राहाता येईल, असे सांगितले. 

कारवाई सूडबुद्धीने - अशोक चव्हाण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केंद्र सरकारकडून ईडीच्या माध्यमातून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे; परंतु महाविकास आघाडी एकसंध असून, या कारवाईचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना दिली.
 

Web Title: New summons to Anil Deshmukh for questioning to ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.