Join us

मुंबईच्या वीज ग्राहकांसाठी नवा पुरवठादार ?, स्पर्धेमुळे बेस्टला कमी दरात वीज खरेदी करणे शक्य होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:43 AM

मुंबईत मेट्रो रेल्वेसारख्या पायाभूत आणि पुनर्विकासाच्या प्रकल्पांमुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट टाटा कंपनीकडून वीज खरेदी करण्याऐवजी बेस्ट निविदा मागवत आहे.

मुंबई : मुंबईत मेट्रो रेल्वेसारख्या पायाभूत आणि पुनर्विकासाच्या प्रकल्पांमुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट टाटा कंपनीकडून वीज खरेदी करण्याऐवजी बेस्ट निविदा मागवत आहे. या स्पर्धेमुळे कमी दरात वीज खरेदी करता येईल, असा बेस्टचा अंदाज आहे.बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागामार्फत कुलाबा, चर्चगेट ते सायन, माहीमपर्यंत १० लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. हा विभाग नफ्यात असल्याने बेस्टचा डोलारा अद्याप उभा आहे. आतापर्यंत बेस्ट टाटा कंपनीकडूनच या ग्राहकांना वीजपुरवठा करीत होती. याबाबतचा करार मार्च २०१८ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे स्वस्त दरात वीजपुरवठा करणा-या कंपनीकडूच वीज खरेदी करण्यासाठी बेस्टने निविदा मागविली आहे. बेस्ट उपक्रमाला ७५० मेगावॅट विजेची गरज आहे.दरम्यान, बेस्ट समितीच्या बैठकीला महाव्यवस्थापक उपस्थित नसल्याने ही बैठक मंगळवारी तहकूब करण्याची वेळ समितीवर आली. समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्षांच्या आधी महाव्यवस्थापकांना उपस्थित राहण्याचा नियम आहे. मात्र दोन वाजताच्या सभेला अडीच वाजले तरी महाव्यवस्थापक आले नाहीत. यामुळे नाराज सदस्यांनी सभा तहकुबीची मागणी केली. सभा तहकूब करतानाच महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे हे समिती कक्षात आले. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त न केल्याने सभा तहकूब करण्यात आली.>इतर पुरवठादारांच्या तुलनेत बेस्टची वीज स्वस्तमुंबई शहरात बेस्ट उपक्रम वीजपुरवठा करते. पूर्व आणि पश्चिम उपनगरात रिलायन्स आणि टाटा वीजपुरवठा करते. पूर्व उपनगरात भांडुप आणि मुलुंड येथे महावितरण वीजपुरवठा करते. रिलायन्स, टाटा आणि महावितरणच्या तुलनेत बेस्टची वीज स्वस्त आहे. बेस्ट उपक्रम कुलाब्यापासून सायनपर्यंत वीजपुरवठा करत आहे. बेस्टच्या उपक्रमाच्या वीजग्राहकांची संख्या दहा लाखांच्या आसपास आहे. उपनगरात वीजपुरवठा करता यावा, म्हणून बेस्टने यापूर्वीच हालचाली सुरू केल्या आहेत, तशी तयारीही त्यांनी दर्शविली आहे. प्रत्यक्षात मात्र, उपनगरात पूर्वीपासून रिलायन्स आणि टाटामध्ये स्पर्धा आहे. रिलायन्सच्या तुलनेत टाटाची घरगुती वीज स्वस्त आहे, तर टाटाच्या तुलनेत रिलायन्सची औद्योगिक वीज स्वस्त आहे, असे वीज क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी, या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये कायमच वीजग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. ३ मध्यंतरी पूर्व उपनगरात पसरलेल्या अंधारामुळे वीजग्राहकांनी संताप व्यक्त केला होता. दोनएक दिवस सातत्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरातीज वीजपुरवठा खंडित होत होता. परिणामी, वीजकंपन्यांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधत तक्रारी केल्या होत्या. मात्र, वीज कंपन्यांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने, वीजग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. ४ वीजग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाटासह रिलायन्सने आपल्या वीजग्राहकांना डिजिटल सेवा-सुविधा प्रदान केल्या आहेत. या सुविधा उपनगरात असल्या, तरी आता बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट टाटा कंपनीकडून वीजखरेदी करण्याऐवजी बेस्ट निविदा मागवत आहे. या स्पर्धेमुळे कमी दरात वीज खरेदी करता येईल, असा बेस्टचा अंदाज आहे.