सीएसएमटी भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी नवीन प्रणाली, पालिकेचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:17 PM2024-11-27T16:17:01+5:302024-11-27T16:20:26+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता आणखी शुद्ध आणि खेळती हवा मिळणार आहे.
मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता आणखी शुद्ध आणि खेळती हवा मिळणार आहे. भुयारी मार्गात खेळती हवा राहण्यासाठी नव्या तंत्रज्ञानासह वायूविजन (व्हेंटिलेशन) प्रणाली बसवण्यात येणार आहे.
परिणामी, भुयारी मार्गाच्या ठिकाणी गर्दीच्या वेळी होणारी अस्वस्थता कमी होण्यास मदत होईल. या प्रणालीत भुयारी मार्गातील गरम हवा बाहेर टाकण्याचे काम मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवासी, पादचारी, पर्यटक मोठ्या संख्येने भुयारी मार्गाचा वापर करतात. येथे खेळती हवा राहण्यासाठी प्रणाली अस्तित्वात असली तर गर्दी लक्षात घेता येथे आधुनिक व अद्ययावत उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार अधिक क्षमतेचे वायूविजन आणि हवा खेळती राहील, यादृष्टीने प्रणाली बसवण्यात येत आहे.
आगीच्या घटनांमध्येही फायदेशीर
आगीसारख्या संभाव्य घटनांचादेखील विचार ही प्रणाली बसवताना करण्यात आला आहे. आगसदृश्य संभाव्यप्रसंगी या यंत्रणेतील मध्यवर्ती पंखे हे अधिक क्षमतेने आणि दुप्पट वेगाने सक्रिय होतील. परिणामी, धूर वेगाने बाहेर टाकण्यासाठी या प्रणालीची मदत होईल. त्यामुळे भुयारी मार्ग परिसरात वावरताना नागरिकांना दृश्यमानतेसाठीही मदत होणार आहे.
९ जेट पंखे लावणार
- वायूविजन प्रणालीअंतर्गत एकूण ९ जेट पंखे संपूर्ण भुयारी मार्ग परिसरात लावण्यात येत आहेत. या जेट पंख्यांमुळे भुयारी मार्गाच्या प्रवेशाच्या ठिकाणची हवा आतमध्ये वेगाने आणण्यासाठी मदत होईल.
- तसेच २ अधिक क्षमतेचे पंखे मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात येत आहेत. या दोन पंख्यांमुळे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्गातील हवा बाहेर टाकण्यासाठी मदत होईल.