मुंबई : मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमधील नव्याने मान्यता मिळालेल्या माध्यमिक खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोंदी शालार्थ प्रणालीमध्ये आढळून न आल्याने समोर आले आहे. याची दखल घेत मुंबई उपसंचालक कार्यालयांकडून यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. अशा शाळांनी कर्मचारी आणि शिक्षकांच्या मान्यता आदेशांसह आणि ओळखपत्राच्या पुराव्यांसह मुंबई उपसंचालक कार्यालयात उपस्थित राहावे, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. ही कार्यवाही ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे.पुणे विभागीय संचालनालय व मुंबई उपसंचालक कार्यालय यांच्याकडून माध्यमिक खासगी अनुदानित शाळांतील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप या नोंदण्या झाल्याचे शालार्थ प्रणालीमध्ये दिसत नाही. अशा प्रकारे नोंदणी करताना शाळांचे दिलेले शालार्थ आयडी चुकीचे देण्यात आले आहेत किंवा त्यांची नोंद चुकीची करण्यात आल्याचे मुंबई उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी कार्यवाहीस्तव काढलेल्या पत्रात म्हटले आहे. पद रिक्त नाही, मान्यता आदेश व आधार कार्ड यांच्या नावात फरक असणे यासारख्या इतर तांत्रिक अडचणींमुळे शालार्थ ड्राफ्ट देण्यास अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.अशा शाळांना संबंधित कर्मचाºयांच्या शालार्थमध्ये नोंदणी करण्यास मिळालेल्या आदेशाची प्रत, आधार कार्ड, शाळेचा शालार्थ आयडी व नावात बदल असल्याबाबतचा पुरावा या सर्वांसह मुंबई उपसंचालक कार्यालयात दिलेल्या तारखेला उपस्थित राहावे लागणार आहे.
नवीन शिक्षक, शिक्षकेतरांच्या नोंदी शालार्थमध्ये नसल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 1:23 AM