४०० कोटी खर्च करुन मुंबईकरांच्या सेवेत नवीन दहा मोनो; दर पंधरा मिनिटांनी धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:06 AM2019-11-01T01:06:46+5:302019-11-01T06:30:38+5:30
सध्या जे रेक चालविले जात आहेत ते मलेशियाई इन्फ्रास्ट्रक्चर फर्म स्कोमी इंजिनीअरिंग आणि लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीने बनविलेले आहेत.
मुंबई : चेंबूर ते वडाळा हा पहिला आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दुसरा मोनोरेलचा टप्पा सध्या सुरू आहे. या दोन्ही टप्प्यांवर धावण्यासाठी सध्या फक्त चारच मोनो आहेत. यामुळे या मार्गावर दर वीस मिनिटांनी मोनोच्या फेऱ्या होतात, मात्र मोनोच्या ताफ्यामध्ये एमएमआरडीएने दहा मोनो सामील केल्यावर दर पंधरा मिनिटांनी मोनो धावेल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. एमएमआरडीएने या दहा मोनोच्या खरेदीसाठी निविदाही काढल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोनो तयार होऊन साधारणत: दीड वर्षांनी मुंबईमध्ये दाखल होतील, असे एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
मोनोच्या दोन्ही टप्प्यांवर सध्या चार मोनो धावत असून एक मोनो राखीव ठेवण्यात आली आहे. मोनोरेलच्या फेºया वाढविण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने मोनोच्या ताफ्यामध्ये दहा मोनो सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तांत्रिक निविदाही काढल्या असून या प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत दोन चिनी कंपन्यांनी स्वारस्यही दाखविले आहे. या दोन्हीपैकी एका कंपनीला मोनोचे कंत्राट मिळणार आहे. यामुळे मोनो चिनी कंपनीच्या असतील असे म्हटले जात आहे.
सध्या जे रेक चालविले जात आहेत ते मलेशियाई इन्फ्रास्ट्रक्चर फर्म स्कोमी इंजिनीअरिंग आणि लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीने बनविलेले आहेत. स्कोमी कंपनीने नियमांनुसार काम न केल्याने आणि वेळेवर मोनो रेक न पुरविल्याने स्कोमी कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्यात आले. आता नव्याने काढलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये सीआरआरसी कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बीवायडी या दोन चिनी कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांपैकी ज्या कंपनीला कंत्राट मिळेल त्या कंपनीला पंधरा महिन्यांमध्ये दहा मोनोंचा पुरवठा करावा लागणार आहे. या दहा मोनोंच्या खरेदीसाठी एमएमआरडीए ४०० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. जेव्हा या दहा मोनो मोनोरेलच्या ताफ्यात सामील होतील तेव्हा दर पंधरा मिनिटांनी मोनो धावेल. यामुळे प्रवाशांच्या संख्येमध्येही वाढ होईल. परिणामी, मोनोरेलच्या महसुलामध्येही वाढ होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
दिवाळीमध्ये प्रवासी आणि उत्पन्नामध्ये वाढ
दिवाळीमध्ये मोनोरेलच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे साहजिकच मोनोच्या उत्पन्नामध्येही वाढ झाली आहे. वडाळा ते जेकब सर्कलदरम्यान धावणाºया या मोनोच्या उत्पन्नामध्ये इतर दिवसांपेक्षा दिवाळीच्या दिवसांमध्ये चांगली वाढ झाली आहे. २७ आॅक्टोबर रोजी मोनोरेल मार्गिकेवर सात हजारपेक्षा कमी प्रवासी होते. तर २९ आॅक्टोबरला मोनो मार्गिकेवर प्रवाशांची संख्या वाढून साडेअकरा हजारांपेक्षा जास्त झाली होती. यामुळे या दिवशी सर्वांत जास्त प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे समोर आले आहे.
दिवाळीतील प्रवाशांची संख्या आणि उत्पन्न
२७ ऑक्टोबर ६,७८६ प्रवासी संख्या
१,३६,३७०(रुपयांमध्ये)
२८ ऑक्टोबर ९,५९१ प्रवासी संख्या
१,९९,७०५(रुपयांमध्ये)
२९ ऑक्टोबर ११,६३० प्रवासी संख्या
२,४२,९९०(रुपयांमध्ये)
कर्मचारी वर्गाने चांगले काम केल्यामुळे त्यांचे अभिनंदन करत असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी स्पष्ट केले आहे. मोनोरेलचे कमी कोच असतानादेखील मोनोरेलची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.