न्यू टिळक ब्रिज ही तर दादरची गरज!

By admin | Published: May 13, 2017 01:28 AM2017-05-13T01:28:43+5:302017-05-13T01:28:43+5:30

वाहतूककोंडीच्या बिकट प्रश्नाने शहरासह उपनगरांत अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केलेले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळे विचार

New Tilak Bridge, Dadra's need! | न्यू टिळक ब्रिज ही तर दादरची गरज!

न्यू टिळक ब्रिज ही तर दादरची गरज!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहतूककोंडीच्या बिकट प्रश्नाने शहरासह उपनगरांत अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केलेले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळे विचार, उपाय समोर येतात. दादरमधील रहिवासी आणि वाहतूकतज्ज्ञ रोहित कात्रे यांनीसुद्धा दादरच्या वाहतूककोंडीवर उपाय शोधला आहे. या संदर्भात अभ्यास करून, तसा आराखडाच त्यांनी पालिकेला सादर केला आहे. आयुक्त अजय मेहता, पालिकेचे प्रमुख अभियंते (पूल) शी. ओ. कोरी यांच्याकडेही सुपुर्द केला. या अधिकाऱ्यांना हा आराखडा आवडलाही, परंतु पुढे अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. ज्यांना हा आराखडा कात्रे यांनी दाखवला, त्या सर्वांनी कौतुक करत तो नेत्यांकडेही सोपविला.
सर्वांनी या संकल्पनेचे आणि आराखड्याचे कौतुक केले, तथापि कार्यवाहीच्या दृष्टीने काहीही झालेले नाही. ‘लोकमत’नेदेखील दादरकरांसाठी उपयुक्त असलेल्या कात्रेंचा हा प्रस्ताव उचलून धरला. या संदर्भात समाजातील सर्व स्तरांंमधील लोकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
सर्वतोपरी सहकार्याची पालिकेची तयारी
वाहतूककोंडीच्या या समस्येवर बनवलेला हा आराखडा चांगला आहे. पुलांसंदर्भात आराखड्यात नमूद केलेली विकासकामे करता आली, तर उत्तमच. या संदर्भात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायला हवे, अथवा हा आराखडा वरिष्ठांना दाखवायला हवा आणि दादरमधील वाहतूककोंडीवर सध्या तरी आमच्याकडे उपाय नाहीत. दादरमधील रस्त्यांच्या विकासाकरिता व रुंदीकरणाकरिता वाव नसल्यामुळे, पालिकेला सध्या या समस्येचे निराकरण करणे कठीण जात आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन वाहतूक पोलिसांसोबत विविध कामे हाती घेणार आहे. त्या संदर्भात सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेष कुमार यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांना वाहतूककोंडी सोडविण्यासाठी लागणारी सर्व मदत करण्याची पालिकेची तयारी आहे.
- रमाकांत बिरादर,
सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग
दुरुस्ती, रुंदीकरणही महत्त्वाचे
नव्या टिळक पुलाची संकल्पना चांगली असली, तरी तो तयार व्हायला खूप कालावधी लागेल. तूर्तास सध्याच्या लोकमान्य टिळक पुलाची दुरुस्ती आणि रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे वाहतूककोंडी निश्चित काही प्रमाणात कमी होईल. विशेष म्हणजे, प्रवाशांचे कमी पैसे खर्च होतील. ग्राहकांसोबत आम्हालाही याचा फायदा होईल. - लक्ष्मण दिवेकर, टॅक्सीचालक
गडकरींनी ठरवले तर होईल!
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी ज्या गतीने देशभर रस्ते आणि उड्डाणपूल बांधत आहेत, ते पाहिले तर नवा टिळक पूल उभारणे सहज शक्य आहे. दोन्ही पुलांमुळे दादर परिसरातील वाहतूककोंडी नक्कीच सुटण्यास मदत होईल.
- सुलभा काळे, प्रवासी
दादरमध्ये प्रवास नकोसा
टिळक पुलावर दिवसभर वाहतूककोंडी असते. या वाहतूककोंडीमुळे प्रवास नकोसा होतो. रुग्णवाहिकांनासुद्धा या वाहतूककोंडीमुळे मार्गक्रमण करणे कठीण होते. या परिस्थितीत या पुलाचे रुंदीकरण गरजेचे आहे आणि जर नवा टिळक पूल बांधला, तर त्याचा खूप फायदा होईल. दादरमधील सगळ््या वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल.
- विजय माने, प्रवासी
पूल बांधा, आधी
दुरुस्तीही करा
नवा टिळक पूल बांधला, तर चांगलेच होईल. त्या अगोदर सध्याच्या लोकमान्य टिळक पुलाची दुरुस्ती आणि रुंदीकरण करणे गरजेचे आहे. लोकमान्य टिळक पुलाचे रुंदीकरण केले आणि न्यू टिळक ब्रिज बांधला, तर दादरमधील वाहतूककोंडीची समस्या नक्कीच सुटेल. - गोपालसिंग गुप्ता, टॅक्सी चालक
सार्वजनिक वाहतुकीवर भर द्यावा
दादरमध्ये नवीन पूल बांधायला जागा नाही, शिवाय टिळक पुलाचे रुंदीकरण करणे शक्य नाही. दादर आणि मुंबईमधील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर देणे गरजेचे आहे. महापालिकेने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मोफत पार्किंगला कुठेच परवानगी देऊ नये. प्रशासनाने वाहनांची संख्या मर्यादित राहील, याची काळजी घ्यावी.
- अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ
दोन इमारतींचा अडथळा
कात्रे यांनी बनविलेला आराखडा चांगला आहे, परंतु नवा टिळक पूल बांधण्यात दोन इमारतींचा अडथळा आहे. न्यू टिळक पुलासाठी जोपर्यंत डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तरतूद होत नाही, तोपर्यंत हा पूल बांधणे शक्य नाही.
- शी. ओ. कोरी,
प्रमुख अभियंता (पूल)
पुलाचा कायापालट शक्य
माझ्या माहितीप्रमाणे लोकमान्य टिळक पुलाचे रुंदीकरण करणे कठीण आहे, परंतु जरी पुलाचे रुंदीकरण करायचे असल्यास, पुलाचा आणि दादरमधील वाहतूककोंडीचा योग्य तो अभ्यास करून, पुलाचा संपूर्ण कायापालट करता येऊ शकतो. सध्या तरी नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करावा, जेणेकरून वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.
- सुधील बदामी, वाहतूकतज्ज्ञ

Web Title: New Tilak Bridge, Dadra's need!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.