मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन सोमवारी संसदेत चांगलाच गदारोळ पहायला मिळाळा. भाजपासह इतरही काही पक्षांच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर आता आणखी एक पुरावा समोर आला आहे. त्यामुळे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
"परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही", असं म्हणत शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला. अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रंच पत्रकार परिषदेत सादर केली. "अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय", असं पवार म्हणाले. मात्र, त्यानंतर काही वेळातच भाजपा नेत्यांनी ट्विट करुन अनिल देशमुख यांनी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद कसकाय घेतली, असा प्रश्न विचारला.
आता, अनिल देशमुख यांनी 15 फेब्रुवारी रोजी नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास केल्याचे एका कागदपत्रातून समोर येत आहे. देशमुख यांच्यासह 8 जणांनी हा प्रवास केला असून त्यात पूजा देशमुख यांचाही समावेश आहे. एका खासगी विमानाने ते नागपूरहून मुंबईला आले. विशेष म्हणजे अनिल देशमुख यांनीही मी 15 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत आयसोलेशनमध्ये होतो, असे व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे सांगितलं आहे. मात्र, नागपूर ते मुंबई या विमानप्रवासाच्या कागदपत्रामुळे पुन्हा एकदा गृहमंत्री देशमुख अडचणीत आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचाही सवाल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचे 15 फेब्रुवारीचे ट्विट रिट्विट केलंय. तसेच, 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद झाली होती. हे नेमके कोण? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. या व्हिडिओत अनिल देशमुख पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे सुरक्षा रक्षकही दिसून येत आहेत. तर, त्यांच्या समोर माध्यमांचे बूम माईकही दिसत आहेत. त्यामुळे, पवारांनी केलेल्या दाव्यावरच प्रश्चचिन्ह निर्माण झालंय.
पत्रकार परिषदेसंदर्भात देशमुखांचं स्पष्टीकरण
कोरोनाचे निदान झाल्यानंतर मी ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला. मी रुग्णालयातून बाहेर पडत असताना तिथे रुग्णालयाच्या गेटवर काही पत्रकार उपस्थित होते. मात्र मला कोविडमुळे थकवा आला होता. माझ्या अंगात त्राण नव्हते. त्यामुळे तिथेच खूर्चीवर बसून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर मी १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होतो. पुढे २८ तारखेला मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलंय.