मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला. या तपासात मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक केली परंतु चौकशीत वेगळाच ट्विस्ट समोर आला. मयूर शिंदे हा आमदार सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असून संजय राऊतांच्याही तो जवळचा असल्याची माहिती उघड झाली. सुरक्षेत वाढ व्हावी यासाठी हा बनाव रचल्याची चर्चा सुरू झाली.
या प्रकरणात आता मयूर शिंदे याचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर आले आहे. मयूर शिंदे याच्या फेसबुक अकाऊंटवरून तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे दिसते. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत मयूर शिंदे याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राज्यात मविआ सरकार असताना हा पक्षप्रवेश झाला होता. राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतरही मयूर शिंदे हा सुनील राऊत यांच्यासोबतच असायचा. मयूर शिंदे हा आगामी मनपा निवडणुकीची तयारी करत होता. त्यासाठी त्याने राष्ट्रवादी पर्याय निवडला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून तो विविध कार्यक्रम आयोजित करत होता.
संजय राऊतांचा भाजपा-शिंदे गटावर आरोपएकीकडे मयूर शिंदे आमदार सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मयूर शिंदे हा सध्या भाजपा किंवा मिन्धे गटात असल्याचे समजले असं संजय राऊतांनी म्हटलं. त्याचसोबत कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो. एकनाथ शिंदे या जवळच्या व्यक्तीस पकडून शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला तसा...राजा ठाकूर प्रकरण फसल्यावर हे घडवले काय? काही विषय संवेदनशील असतात. याचे भान नसलेले लोकच असे बोलू आणि लिहू शकतात असं म्हणत संजय राऊतांनी आरोप फेटाळले.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली असून मयूर शिंदे हा संजय राऊतांच्याही जवळचा आहे. संजय राऊतांची सुरक्षा वाढावी यासाठी मयूर शिंदेने हा बनाव रचला. मयूर शिंदेने स्वत: फोन केला नव्हता तर इतर साथीदारांना फोन करायला सांगितले. मयूर शिंदे हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी असून त्याला पोलिसांनी अटक केली.