लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे पार्थिव विच्छेदनासाठी आणण्यात आले त्यावेळी त्याच्या मानेवर जखमा होत्या, अशा आशयाचे वक्तव्य रूपकुमार शाह नामक रुग्णालय कर्मचाऱ्याने सोमवारी केले. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या शहा यांनी वरील दावा करताना म्हटले आहे की, ‘सुशांतच्या मृत्यूदिनी कूपर रुग्णालयात विच्छेदनासाठी पाच मृतदेह आणण्यात आले होते. त्यापैकी एक मृतदेह व्हीआयपीचा होता. विच्छेदन करतेवेळी तो मृतदेह सुशांतसिंहचा असल्याचे समजले. त्याच्या मानेवर दोन-तीन खुणा होत्या. विच्छेदन अहवालासाठी त्याची नोंद करणे आवश्यक होते. वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचेही सांगितले. मात्र, वरिष्ठांनी मला लवकरात लवकर फोटो क्लिक करून मृतदेह पोलिसांना देण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही रात्रीच पोस्टमॉर्टम केले.’
संबंधित कर्मचारी हा आरएन कूपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलचा कर्मचारी नसून तो महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी आहे. त्यामुळे त्याच्याशी पालिकेचा कोणताच संबंध नाही. - डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय
जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये दिसणारा रूपकुमार हा आमचा कक्ष शवगृह सेवक आहे. तो कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात कामाला आहे. आमच्याकडेही तो व्हिडीओ आला आहे. त्याबाबत कार्यलयीन स्तरावरील कार्यवाही आम्ही करू. त्याबाबत नक्कीच त्याला विचारणा केली जाईल. यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ. - डॉ. कपिल पाटील, पोलिस शल्यचिकित्सक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"