मुंबई :
मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलाव परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र जुने झाल्याने त्या जागेवर आता नवे केंद्र उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्याचे केंद्र हे १८ दशलक्ष लिटर क्षमतेचे असून, नवे केंद्र २५ दशलक्ष लिटर क्षमतेचे असणार आहे.
तुळशी तलावाचे बांधकाम १८७२ मध्ये करण्यात आले होते. या तलावाची पाणी साठवण क्षमता आठ हजार ४५ दशलक्ष लिटर एवढी आहे. आरे कॉलनी, मरोळ पोलिस लाइन आणि साई बांगोडा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९८५ मध्ये या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले.
तेव्हापासून ३९ वर्षे या केंद्रातून येथील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु हे केंद्र आता जुने झाले असून, त्याचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे नव्या केंद्राचे बांधकाम करण्याचा निर्णय जलअभियंता विभागाने घेतला आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या केंद्रामुळे पाणी शुद्ध करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
सल्लागारास एक कोटी मोजणार जुलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रस्तावाची सुसाध्यता तपासणे, तपशीलवार अभ्यास, तांत्रिक आणि पर्यावरणीय बाबी सल्लागाराला तपासाव्या लागणार आहेत. त्यानंतर सविस्तर अहवाल तयार केला जाईल. या कामासाठी सल्लागाराला एक कोटी रुपये शुल्क देण्यात येणार आहे.