नवं जग, नवा रेडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:06 AM2021-02-12T04:06:17+5:302021-02-12T04:06:17+5:30

१३ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. केवळ ११० वर्षांचं आयुष्य लाभलेलं हे माध्यम ...

New world, new radio | नवं जग, नवा रेडिओ

नवं जग, नवा रेडिओ

Next

१३ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. केवळ ११० वर्षांचं आयुष्य लाभलेलं हे माध्यम तसं तरुणच म्हणायला हवं. आजही आधुनिक समाजासाठी ते अत्यावश्यक ठरलंय. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर तर आपल्याला त्याचं मूल्यवर्धन अधिकच जाणवलंय. विकसनशील देशांत ७५ टक्के ‘पेनेट्रेशन रेट’ असलेलं हे माध्यम सामाजिक माध्यमांच्या गदारोळातदेखील सर्वाधिक अ‍ॅक्सेसिबल ठरलंय. आपल्या देशातील सार्वजनिक सेवा प्रसारक असलेल्या आकाशवाणीच्या नेटवर्कनं ही बाब सिद्ध केलीच आहे. कोरोना काळातही आणि नेहमीच!

म्हणूनच या महासंकट काळात आपल्या प्रतिसादात्मक कृतीसाठीचं महत्त्वपूर्ण टूल म्हणून रेडिओ खूपच उपयुक्त ठरलाय. अनेक जीव वाचविण्यात रेडिओवरील आरोग्यविषयक सूचना उपयुक्त तर ठरल्याच आहेत. परंतु विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच व्देषमूलक भाषण टाळण्यातही या माध्यमानं महत्त्वाची भूमिका बजावली. युनेस्कोतर्फे हा जागतिक रेडिओ दिन दरवर्षी साजरा केला जातो. युनेस्कोच्या महासंचालक औड्रे अझौले यांनी याप्रसंगी दिलेल्या संदेशात या सर्वाची वाखाणणी करून जगातील अनेक रेडिओ केंद्रांनी खोट्या माहितीच्या प्रसाराला रोखण्यासाठी मदत केलीय.

शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या अनेक गरजू आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी रेडिओनं महत्त्वाची भूमिका बजावलीय. डेमाॅक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोसारख्या देशात कम्युनिटी रेडिओच्या जाळ्याने ४० लाख लोकांपर्यत शैक्षणिक मजकूर पोहोचविला. असाच प्रयोग जिल्हा परिषद, नाशिक आणि आकाशवाणीनंदेखील करून चार महिने शैक्षणिक कार्य विनाखंड चालू ठेवलं.

थोडक्यात रेडिओ हे असं माध्यम आहे, की जे दैनंदिन स्वरूपात टिकून राहण्याबरोबरच नवप्रवर्तन (इनोवेशन) प्रक्रियेत सहज सामावू शकतं. आपण जगत असलेल्या प्रतिमांच्या(इमेजेस) शतकात त्याची साथ आपल्याला रोज सकाळ - संध्याकाळ मिळत राहाते आणि त्यातून समजून घेणं आवश्यक असलेले सर्व विचार ऐकायला मिळतात. इंटरनेट रेडिओ, पाॅडकास्ट्स, स्मार्टफोन्स आणि नवीन तंत्रज्ञानांच्या उपलब्धतेमुळे ते एक युवकांचं माध्यम म्हणून फुलतंय.

यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाचं घोषवाक्य होतं ‘नवं जग नवा रेडिओ’. यातून रेडिओ माध्यमाची आजच्या आणि उद्याच्या जगातील मध्यवर्ती भूमिका सहज लक्षात येते. कारण स्वातंत्र्य मूल्य आणि वैश्विक मानवी माध्यम म्हणून रेडिओच्या अस्तित्वावाचून माहितीचा अधिकार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मूलभूत मूल्यांना बळकटी लाभणार नाही. सांस्कृतिक वैविध्य टिकविण्यातदेखील रेडिओ महत्त्वाचा आहे. कारण कोणत्याही प्रकारचा आवाज नसलेल्या समाजाला आवाज मिळवून देण्याचं काम रेडिओनेच केलंय.

‘नवं जग, नवा रेडिओ’ या यंदाच्या घोषवाक्यातून आपल्या लक्षात येतं ते मानवतेच्या इतिहासात असलेलं रेडिओचं स्थान. समाजातील विविध बदलांशी त्यांच्या सेवेनं जुळवून घेतलंय. जसं जग बदलतंय तसा रेडिओ बदलतो. म्हणून हे घोषवाक्य रेडिओच्या सर्वस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेला सलाम करतं. सामाजिक बदल आणि श्रोत्यांच्या बदलाच्या गरजांनुसार हे माध्यम बदलत गेलं. कोणत्याही वेळी, केव्हाही उपलब्ध होण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे व्यापक लोकसंख्येशी हे माध्यम ‘कनेक्ट’ होतं म्हणूनच अजूनही जगभरात हे सर्वात जास्त वापरलं जाणारं माध्यम जगानुसार उत्क्रांत झालंय, अगदी वैयक्तिक क्षणांशीही ते जोडलं गेलंय. त्याचप्रमाणे त्यानं स्वतःला इनोव्हेट केलंय. नवीन तंत्रज्ञानाशी जळवून घेतल्यामुळेच, हे माध्यम ‘मोबिलिटी’ देत सदासर्वकाळ उपलब्ध आहे. काल - परवापर्यंत घरामध्ये ट्रांझिस्टरच्या स्वरूपातील त्याचं स्थान आता स्मार्टफोनमुळे सर्वव्यापी सर्वत्र आणि सदासर्वदा झालंय. तंत्रज्ञानातील प्रगती आणि डिजिटलायझेशनमुळे रेडिओला नवीन प्रकारची वागणूक आणि जीवनशैली आत्मसात करता आलीय. आता रेडिओ हे केवळ ध्वनी माध्यम नाही, आता रेडिओ टीव्हीवर ऐकला जातो आणि टीव्ही रेडिओवर.

नैसर्गिक आपत्ती असो, वा आर्थिक, सामाजिक संकट असो किंवा महामारी, रेडिओची सेवा समाजाला उपलब्ध आहे. कोणतीही घटना घडो. आज आपण रेडिओ़द्वारे एकमेकांशी कनेक्टेड राहतो. लोकसेवाविषयक उद्घोषणा असो, अलर्ट असो वा प्रसारण किंवा शिक्षण प्रक्रियेची निरंतरता रेडिओची सेवा कुठेही कमी नाही, हे उदाहरणांतून दिसून आलंच आहे. श्रोत्यांच्या गरजा भागविणारं हे एक बहुउपयोगी आधुनिक माध्यम आहे. कारण हे आहे ‘नवं जग आणि हा आहे नवा रेडिओ’.

- शैलेश माळोदे, लेखक विज्ञान पत्रकार आणि आकाशवाणी नाशिक केंद्राचे प्रमुख

Web Title: New world, new radio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.