लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जुने वर्ष सरले असतानाच आता २०२१ या वर्षात ४ ग्रहणे, ११ उल्का वर्षाव, ३ धूमकेतू, युती-प्रतियुती, सुपरमून, ब्लॅक मून आणि ग्रह पाहण्याची संधी मिळेल. पृथ्वीजवळून ६ धोकादायक लघुग्रह जातील, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
२०२१ मध्ये केवळ ४ ग्रहणे होणार असून त्यात दोन चंद्र आणि दोन सूर्यग्रहणे आहेत. भारतातून मात्र काही भागातून केवळ २ ग्रहणे पाहता येतील. २०२१ मध्ये १८ धूमकेतू पृथ्वीजवळ येणार आहेत. त्यापैकी बहुतेक दुर्बिणीतून दिसतील. काही साध्या डोळ्याने दिसणार आहेत. २ मार्च, २१ मार्च, २५ मे, १ जून, ४ जुलै, १३ जुलै, १४ ऑगस्ट या काळात लघुग्रह पृथ्वीजवळ येणार आहेत. तर २०२१ मध्ये १८ धूमकेतू पृथ्वीजवळ येतील. त्यापैकी बहुतेक दुर्बिणीतून दिसतील. काही साध्या डोळ्याने दिसतील. २७ मे रोजी ७ पी पॉन्स-विनेक हा धूमकेतू १५ जूनपर्यंत पृथ्वीच्या ०.४४ एयु अंतरावर येईल तेव्हा त्याची तीव्रता १०/११ असेल आणि साध्या डोळ्याने दक्षिण गोलार्धातून दिसू शकेल. तर २७ सप्टेंबर, ९ नोव्हेंबर रोजीही धूमकेतू पृथ्वीजवळ येणार आहेत.
* सुपर मून - ब्लॅक मून
११ फेब्रुवारी रोजी ब्लॅक मून
१४ एप्रिल, ११ मे, ८ जून रोजी मायक्रो मून (चंद्र पृथ्वीच्या दूर)
२७ एप्रिल रोजी सुपर मून
२६ मे रोजी सुपर फ्लॉवर मून
२४ जून रोजी सुपर मून
२२ ऑगस्ट रोजी ब्लू मून दिसेल
-----------------