लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील ७८ टक्के भाडेकरू २०२१ मध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असल्याचे इंडिया रिअल इस्टेट रिपोर्ट २०२० मधून निदर्शनास आले असून, मुंबईतील सुमारे तीन चतुर्थांश म्हणजे ७३ टक्के लोक हे पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. तर बहुतांश खरेदीदार ९२ टक्के कायमस्वरूपी मालमत्ता तर ८ टक्के लोक गुंतवणुकीच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करीत आहेत.
घराबाबत ४३ टक्के लोक रियल इस्टेट वेबसाइटची निवड करतात तर ४१ टक्के लोक त्यांच्या सामाजिक संबंधांतून, मध्यस्थांकडून शोध घेतात. आणि स्वतंत्र घर, स्वतंत्र मजल्यांऐवजी सोसायटीत निवास शोधणाऱ्या भाडेकरूंचे प्रमाण सर्वाधिक ७५ टक्के एवढे आढळून आले. ८८ टक्के भाडेकरू रेंटल ॲग्रीमेंट करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलचा वापर करत असल्याचे चित्र आहे. ७९ टक्के घरमालकांनी भाड्यासाठी संपूर्ण कुटुंबाला प्राधान्य दिले. मुंबईतील फक्त १९ टक्के घरमालकांनी बॅचलर्सना भाड्याने घर देण्याची इच्छा व्यक्त केली. सोसायटीत राहण्याची इच्छा असलेल्या खरेदीदारांची संख्याही मुंबईत सर्वाधिक म्हणजे ८२ टक्के आहे. मुंबईत घर शोधणाऱ्यांपैकी ८७ टक्के लोक रेडी-टू-मूव्ह-इन किंवा रिसेलच्या घरांना प्राधान्य देतात.
मालमत्तेचा शोध घेणाऱ्यांपैकी सर्वाधिक २० टक्के लोक घर खरेदीसाठी १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त बजेटचे घर घेण्यास उत्सुक आहेत. यामागे या भागातील प्रॉपर्टीचे वाढीव दर तसेच स्टँप ड्युटीच्या शुल्कात झालेली कपात ही कारणे आहेत. मुंबईमध्ये १ बीएचके घर शोधणाऱ्या लोकांची संख्या ४९ टक्के सर्वाधिक आहे, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञ सौरभ गर्ग यांनी दिली.