मुुंबई पोलिसांचे कौतुक : एकाही अनुचित घटनेची नोंद नाहीमुंबई : पोलिसांच्या अचूक व्यूहरचनेमुळे मुंबईकरांनी अत्यंत उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात नव्या वर्षाचे स्वागत केले. गेट वे आॅफ इंडियासह प्रत्येक चौपाटीवर लाखोंच्या संख्येने गर्दी उसळूनही एकाही अनुचित घटनेने किंवा गुन्ह्याने या उत्साहाला गालबोट लागले नाही. यामुळे मुंबई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.अनेक ठिकाणी अचानकपणे लावलेली नाकाबंदी, रात्र-मध्यरात्र सोडाच पण दिवसाढवळ्याही नाक्या-नाक्यांवर दिसणारे पोलीस असे चित्र या आठवड्यात शहरात दिसत होते. थर्टीफर्स्टला या कारवाया आणखी प्रकर्षाने जाणवत होत्या. काल संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत मुंबई पोलीस दलातले तब्बल ७० टक्के मनुष्यबळ रस्त्यांवर तैनात होते. एकट्या गिरगाव चौपाटीवर सुमारे पाचशे पोलिसांचा बंदोबस्त होता. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गेटवे आॅफ इंडिया, शहरातल्या सर्व चौपाट्या आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांवर मुंबईकरांनी गर्दी केली होती. या गर्दीत महिलांविरोधी गुन्हे घडू नयेत, धक्काबुक्की-चेंगराचेंगरीचे प्रकार होऊ नयेत, सोनसाखळीचोरीसारख्या स्ट्रीट क्राइमच्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक ठिकाणी मुंबई पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही, चित्रण न्याहाळण्यासाठी कंट्रोलरूम, गर्दीतील हालचाली टिपण्यासाठी वॉच टॉवर्स उभारले होते. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या गर्दीतील कुटुंब आणि ग्रुप यांना स्वतंत्र ठेवण्यासाठी पोलीस धडपडत होते. नाक्यानाक्यांवर, गल्लीबोळात पोलीस होते, गस्त होती. यामुळे मुंबईकरांना अत्यंत सुरक्षित वातावरणात, उत्साहात नव्या वर्षाचे स्वागत करता आले.पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्याने उत्साहाला गालबोट लागलेले नाही, अशी प्रतिक्रिया पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)सेलीब्रेशन आवारातच : गेट-वे, मरिनड्राइव्ह, गिरगाव चौपाटी किंवा जुहू किनाऱ्यावर जमलेल्या गर्दीत मिसळून नववर्षाचे स्वागत करण्याचा मोह या वेळी बहुसंख्य मुंबईकरांनी आवरला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याऐवजी इमारतीचा आवार, गच्ची किंवा घरच्या घरीच सेलीब्रेशन करण्याचा ट्रेण्ड या वर्षीच्या थर्टीफर्स्टला प्रकर्षाने दिसला. वाहतूक पोलिसांची ठिकठिकाणी लागलेली नाकाबंदी, पोलिसांची गस्त, पार्किंगची अडचण आणि अनोळख्या गर्दीत घडणारे संभाव्य गुन्हे लक्षात घेऊन बहुतांश मुंबईकरांनी प्रवास टाळून घरच्या घरी थर्टीफर्स्ट सेलीब्रेट केला.
नववर्षाचा जल्लोष उत्साहात!
By admin | Published: January 02, 2015 12:37 AM