म्हाडाची नववर्ष भेट; ४,७०० घरांची लॉटरी
By admin | Published: January 1, 2015 03:34 AM2015-01-01T03:34:27+5:302015-01-01T03:34:27+5:30
देशाची आर्थिक राजधानी व आसपासच्या परिसरात हक्काच्या छपरासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी एक खूशखबर आहे.
महिनाअखेरीस नियोजन : विरारमध्ये ३ हजार, मुंबईत १ हजार व ठाण्यात ७०० घरे
जमीर काझी - मुंबई
देशाची आर्थिक राजधानी व आसपासच्या परिसरात हक्काच्या छपरासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. नव्या वर्षात म्हाडा त्यांंच्यासाठी थोडीथोडकी नव्हे, तर जवळपास ४,७०० घरांची लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या फ्लॅटच्या किमती सरासरी ५० हजार ते दीड लाखांनी कमी असणार आहेत.
मुंबईत एक हजार, ठाण्यात ७०० तर विरार-बोळींज या ठिकाणी ३ हजार घरांच्या प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी या सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. येत्या महिनाअखेरीस त्याबाबतचे अंतिम नियोजन केले जाणार असून, प्रतिवर्षाप्रमाणे ३१ मे रोजी लॉटरी काढली जाईल, असे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांमध्ये म्हाडाने लॉटरी काढलेल्या घराच्या किमती जवळपास खासगी बाजारभावाप्रमाणे असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यामुळे अनेक विजेत्या अर्जदारांनी घरांवरील हक्क सोडला. त्या पार्श्वभूमीवर या वर्षापासून घरांच्या बांधकाम खर्चावरील व्यवस्थापनाच्या रकमेतील व्याजाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विविध उत्पन्न गटातील घरांच्या गेल्या वर्षाच्या किमतीपेक्षा सरासरी ५० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतचे दर कमी असणार आहेत. लोकसभा निवडणुकांमुळे या वर्षी ३१ मे ऐवजी मुंबई व कोकणातील २,६४१ घरांची लॉटरी ३१ मेऐवजी २५ जूनपर्यंत लांबली होती. मात्र २०१५ मध्ये मेच्या अखेरीस लॉटरी काढण्याचे निश्चित केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घरांच्या तुटवड्यामुळे हैराण झालेले मध्यमवर्गीय नागरिक रास्त दरात निवारा उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा करीत असतात.
आता या वर्षी मुंबईतील मालाड, कुर्ला, पवई या ठिकाणी बांधकाम चालू असलेल्या घरांची संख्या साधारण ८०० ते १००० पर्यंत आहे. त्या शिवाय ठाण्यातील बाळकुम, चितळसर येथील ७०० घरांच्या प्रकल्पाचे निम्मे काम पूर्ण होत आले आहे. तर विरार-बोळिंज येथील प्रकल्पातील २१ मजली इमारतीच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येथील १३ मजल्यांवरील घरांचे काम लवकर सुरू केले जाणार आहे. तेथे जवळपास ३,००० घरे उपलब्ध होणार आहेत.
म्हाडाने बांधलेल्या फ्लॅटच्या बांधकाम खर्चावरील व्यवस्थापन रकमेच्या व्याजाचे प्रमाण कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०१५ मध्ये काढण्यात येणाऱ्या लॉटरीतील घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने त्याचे नियोजन केले जात आहे.- सतीश गवई,
म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी