Join us

नव्या वर्षात मुंबईकरांच्या भेटीला आले हिमालयीन गिधाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:35 AM

नॅशनल पार्कमध्ये वावर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या तीन दिवसांपासून हिमालयातील गिधाड आढळत असून, हे गिधाड येथे पहिल्यांदाच आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, येथे पहिल्यांदा आढळलेल्या या गिधाडावर कावळे आणि घारी यांच्याकडून सुरक्षेच्या दृष्टीने हल्ला केला जात असल्याची शक्यता पक्षीतज्ज्ञांनी वर्तविली असून, येथे पहिल्यांदा दाखल झालेला गिधाड जखमी तर होणार नाही ना, याची काळजी घेतली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गिधाडाच्या हालचाली टिपल्या जात असून, त्याची निरीक्षणे नोंदवली जात आहेत.यंदाच्या हिवाळ्यात मुंबईकरांना एका नव्या पाहुण्याचे दर्शन होत आहे. तो नवा पाहुणा म्हणजे हिमालयीन गिधाड. गेल्या तीन दिवसांपासून उद्यानात गिधाडाचे दर्शन होत आहे, अशी माहिती शैक्षणिक अधिकारी जयेश विश्वकर्मा यांनी दिली. जयेश यांच्या म्हणण्यानुसार उद्यानात यापूर्वी गिधाड निदर्शनास आले की नाही किंवा त्याची तशी नोंद कागदावर नाही. मात्र, आता नव्या वर्षात निदर्शनास येत असलेले हिमालयीन गिधाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गिधाड नेमके येथे कसे आले? याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. मुळात थंडीत पक्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होतात. याचाच हा एक भाग असावा, असे म्हटले जात आहे.  मुळात हे गिधाड जेथे निदर्शनास आले आहे त्या भागात वाघ, सिंह, बिबट्या यांचे पिंजरे आहेत. या प्राण्यांना मांस दिले जाते. यातील उरलेले मांस, हाडे लगत टाकली जातात किंवा कंपोस्ट केली जातात. कदाचित या मांस अथवा हाडांकडे गिधाड आकर्षित झाले असावे, असाही अंदाज आहे. मात्र, उद्यानात पहिल्यांदा गिधाड आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून उद्यानात पहिल्यांदा गिधाड आढळल्याने येथे कावळे आणि घारी त्यावर हल्ला करत आहेत किंवा त्याभोवती घिरट्या घालत आहेत, अशी माहितीही जयेश यांनी दिली. दरम्यान, हे गिधाड जखमी होणार नाही. इतर पक्ष्यांचा त्याला त्रास होणार नाही. याबाबत लक्ष ठेवले जात आहे. निरीक्षणे नोंदविली जात असून, नव्या वर्षात उद्यानात दाखल झालेल्या गिधाडाने सर्वांना सुखद धक्का दिला आहे.

२०१७ साली हिमालयीन गिधाड कर्नाटक, हैदराबाद येथे निदर्शनास आला होता.भारतात नऊ प्रजातींचे गिधाड आढळतात.हिमालयीन गिधाड तिबेट, मंगोलिया, हिमालयात आढळतात.