Join us

मुंबईत नववर्षाचे स्वागत जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 2:38 AM

तरुणाईने सेलिब्रेशन करत जपली सामाजिक बांधिलकी; सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात संपूर्ण मुंबईकर रंगून गेले होते. वर्षाअखेरीच्या पार्ट्या आणि कार्यक्रमाला मंगळवारच्या सायंकाळपासूनच सुरुवात झाली होती. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहर रोषणाईने झगमगले होते. या रोषणाईत मंगळवारी आकाशातील आतषबाजीचीही भर पडली, तसेच तरुणाईने सेलिब्रेशनसोबत चहा-नाश्ता, पिण्याचे पाणी इत्यादी सेवा मुंबई पोलिसांना पुरविल्या. मध्यरात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षावदेखील सुरू होता.शहरात तुरळक ठिकाणी नव्या वर्षांच्या आगमनावेळी फटाके फोडण्यात आले, तसेच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी चौपाट्यांवर गर्दी केली होती. नरिमन पॉइंट, गेटवे आॅफ इंडिया, येथे मुंबईकरांनी गर्दी केली. महाविद्यालयीन तरुणांची तर यामध्ये खास उपस्थिती होती, तसेच अनेकांनी सहकुटुंब उपस्थित राहून आनंदाचे क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले.चौपाट्यांसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. संध्याकाळनंतर किनाऱ्यांवरची गर्दी वाढत गेली की, नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत बसण्यासाठी लोकांना जागा शोधावी लागत होती. अनेक पर्यटक मध्यरात्री उशिरापर्यंत किनाºयांवर रेंगाळत होते. मुंबईकरांच्या संरक्षणासाठी किनाºयावर, पर्यटनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.अभिषेक सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्या वतीने जुहू येथे पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यरत असणाºया पोलिसांसोबत ‘वन कप टी विथ पोलीस’ या संकल्पेनेवर आधारित एक कार्यक्रम घेण्यात आला. नव्या वर्षात सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती संस्थेच्या ंअध्यक्षा सुनिता नागरे यांनी दिली, तसेच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात नवीन वर्षांच्या शुभेच्छा देणारे संदेश, ग्रीटिंग कार्ड इत्यादी भेटवस्तू तरुणाईने आपल्या प्रियजनांना दिल्या.