नव्या वर्षातील पहिला सूर्योदय करा कॅमेऱ्यात कैद; निवडक छायाचित्रांचा होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 03:32 AM2018-12-31T03:32:39+5:302018-12-31T03:33:15+5:30
सरत्या वर्षाच्या निरोपासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि जनसंपर्क महासंचालनालयाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबई : सरत्या वर्षाच्या निरोपासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि जनसंपर्क महासंचालनालयाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यात सर्वात आधी सूर्योदयाची किरणे ज्या जिल्ह्यात पोहोचतात त्या गोंदिया आणि सर्वात उशिरा सूर्यकिरणे दाखल होतात त्या मुंबईत नव्या वर्षातील पहिल्या सूर्योदयाची छायाचित्रे काढण्याचे आवाहन या विभागाने नागरिकांना केले आहे.
गोंदियाला महाराष्ट्राचा ‘उगवत्या सूर्याचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात पहिला सूर्योदय गोंदियामध्ये होतो. तेथे सूर्योदय झाल्यानंतर साधारणत: २७ मिनिटांनंतर मुंबईत सूर्योदय होतो. या दोन्ही ठिकाणी पर्यटक, छायाचित्रकार, विद्यार्थी, नागरिकांनी नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अनोखी छायाचित्रे काढून फोटोओळीसह पाठवावी. निवडक छायाचित्रांना राज्य शासनाच्या सोशल मीडियासोबतच एमटीडीसीच्या प्रसिद्धी सामग्रीत स्थान दिले जाणार आहे. शिवाय, पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रकारांना एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये तीन दिवस राहण्याची सोय करण्यात येणार आहे. छायाचित्रे dgiprsocialmedia@gmail.com या ई-मेलवर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पहिले किरण गोंदियात
महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रावर पडणारी पहिली सूर्यकिरणे गोंदिया जिल्ह्यावरच पडतात. कोकण किनारपट्टी आणि मुंबई शहर हे अतिपश्चिमेकडे असल्याने येथे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही उशिरा होतात. गोंदिया जिल्ह्याच्या तुलनेत मुंबईत साधारण २७ मिनिटे उशिरा सूर्योदय होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुमारे ९९४ किलोमीटर इतके अंतर आहे. पृथ्वीला परिवलनाद्वारे हे अंतर पार करण्यास साधारण २७ मिनिटे लागतात.