वसई : रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र ज्या दिवशी अयोध्येला परतले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. विजय आणि आनंदाचे प्रतीक म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घरोघरी उंच गुढ्या उभारण्यात येतात. याच दिवशी शालीवाहन शकही सुरू झाले. शालीवाहनानेही याच दिवशी शत्रुवर अंतिम विजय मिळवला होता. असा हा गुढीपाडवा वसई-विरारमधील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्रान केले जाते. त्यानंतर आंब्याची तोरणे तयार करून दारावर बांधण्यात येतात. सूर्योदयानंतर लगेच दरवाजा आणि खिडकीच्या भागात गुढी उभारण्यात येत असते. या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद वाटण्यात येतो. गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये गोडधोड करण्यात येते. ग्रामीण भागात तर अनेक घरांच्या आवारात रांगोळ्याही काढण्यात येतात. वसई विरारमध्ये उद्या विविध सामाजिक संघटनांतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. या शोभायात्रेत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक देखावे असतात. (प्रतिनिधी)विक्रमगड : मराठमोळ्या आणि पारंपारीक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ग्रामीण भागही सज्ज झाला आहे. ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळा, खाजगी शाळा, वस्तीगृह येथील सर्व विद्यार्थी या शोभायात्रेत सहभागी होतात. संस्कृती मंडळ विक्रमगड गेल्या १० वर्षापासून या शोभायात्रेचे आयोजन करीत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ८ वा. महादेव मंदिर येथून या शोभायात्रेचा प्रारंभ होतो. यामध्ये चित्ररथ, ग्रंथदिंडी, महिलांचे लेझीम, आदिवासी पारंपारीक नृत्य, आदिवासी पारंपारीक वेशभुषा, पारंपारीक पेहराव करून मोठ्या प्रमाणात नागरीक सहभाग घेणार आहेत. विक्रमगड शहरात ही शोभायात्रा निघत असून शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी चौकात रांगोळ्या काढून गुढ्या उभारून कार्यक्रम केला जातो. (वार्ताहर)
शोभायात्रांनी नववर्षाचे स्वागत
By admin | Published: March 20, 2015 10:54 PM