नव्या वर्षाचे स्वागत लोटांगणाने, मंदिरांत अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 07:14 AM2018-01-02T07:14:31+5:302018-01-02T07:14:42+5:30
थर्टीफर्स्ट सेलीब्रेशननंतरच्या अवघ्या काही तासांतच सोमवारी नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी असंख्य मुंबईकरांनी सकाळपासून विविध मंदिरांत गर्दी केली होती. याउलट बहुतेक मुंबईकरांनी घरी आराम करणे पसंत केले.
मुंबई : थर्टीफर्स्ट सेलीब्रेशननंतरच्या अवघ्या काही तासांतच सोमवारी नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी असंख्य मुंबईकरांनी सकाळपासून विविध मंदिरांत गर्दी केली होती. याउलट बहुतेक मुंबईकरांनी घरी आराम करणे पसंत केले. त्यामुळे एरव्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी वाहतूककोंडीने त्रस्त असलेले मुंबईतील रस्ते वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुनेसुने दिसत होते.
मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वे आणि बस सेवेवरचा भारही आज काही प्रमाणात हलका झाल्याचे दिसले. दुसरीकडे मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी सुरू केली होती. यामध्ये प्रामुख्याने प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, बाबुलनाथ मंदिर, भुलेश्वर येथील स्वामीनारायण मंदिर, मालाड येथील वैष्णोदेवी मंदिर, मानखुर्द येथील नर्मदेश्वर मंदिर, जुहू बीचजवळील ईस्कॉन मंदिर, कांजूरमार्ग येथील मिनी सबरीमाला मंदिरात मुंबईकरांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
मंदिर परिसरांत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. वाहने अधिक वेळ वाहतूककोंडीत अडकू नयेत, म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांना विशेष लक्ष द्यावे लागले. तर रेल्वेमध्ये दररोज दरवाजापर्यंत उभे राहून प्रवास करणाºयांना आज अचानक रिकामी खुर्ची दिसल्यानंतर सुखद धक्का मिळाला. तीच अवस्था बसची होती. तिकीटघरांसमोरील रांगांची लांबीदेखील कमी झालेली पाहायला मिळाली.
सात लाख भाविक सिद्धिविनायकाचरणी
दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुतेक मुंबईकरांनी नववर्षाचा श्रीगणेशा श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केल्याचे दिसले. सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे सात लाख भाविकांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याची माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. भाविकांना दर्शनात अडचण येऊ नये म्हणून सोमवारी रात्री १.३० वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी
मुंबईतील मंदिरांसह महालक्ष्मी येथील हाजी अली दर्गा, माहीम येथील मखदूम अली शहा दर्गा, वांद्रे येथील माउंट मेरी चर्च, दादर येथील पोर्तुगीज चर्च, भायखळा येथील ख्रिस्त चर्चमध्येही भाविक नतमस्तक होण्यासाठी एकवटले होते. जैन मंदिरे आणि पारसी अग्यारींमध्येही नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसली.