Join us

नव्या वर्षांत नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांसाठी खास आकर्षक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 2:33 AM

टॅक्सी डर्मी केंद्र व व्याघ्र परिचय केंद्राचे रूपडे पालटणार

मुंबई : नवीन वर्षात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पर्यटकांसाठी उद्यान व वन्य जिवांची माहिती देणारे निसर्ग माहिती केंद्र, लहान मुलांसाठी चिल्ड्रेन पार्क, तरुणाईसाठी सेल्फी पॉइंट, अद्ययावत टॅक्सी डर्मी केंद्र व मुख्य आकर्षण असलेले गुफेच्या आकाराचे व्याघ्र परिचय केंद्र हे पर्यटकांना नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.उद्यानात पूर्वापार असलेले मधमाश्यांच्या पोळ्याच्या आकाराच्या रचनेचे निसर्ग माहिती केंद्र आहे. याचे नूतनीकरण करून सौरऊर्जेचा वापर करून केंद्राला फुलपाखराचा आकार देण्यात येत आहे. निसर्ग माहिती केंद्र हे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहे. याशिवाय त्या ठिकाणी असलेल्या फुलपाखरू उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम पुढील काही महिन्यांत पूर्ण होणार आहे. निसर्ग माहिती केंद्रात येणाऱ्या विविध शाळांच्या सहली, तसेच मुंबई शहर, उपनगर आणि मुंबई बाहेरील पर्यटकांसाठी उद्यानाची सखोल माहिती दिली जाणार आहे. केंद्रातून रानवाटांच्या भ्रमंती, आकाश दर्शन, वन्यजीव संवर्धन व संरक्षणाकरिता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व कार्यशाळांचे आयोजन केले जाते. नूतनीकरणांतर्गत सीईई अहमदाबाद या संस्थेद्वारे माहिती फलक, सूचना फलक आदींची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती कृष्णगिरी उपवनचे वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश देवरे यांनी दिली.चिल्ड्रन पार्कमध्ये लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी नव्या साहित्यांचा वापर केला जाणार आहे. यात विविध प्रकारचे आकर्षक गझिबो तयार करण्यात आले आहेत. अनेक प्रकारच्या खेळाचे साहित्य बसविण्यात येत आहे. याशिवाय चिल्ड्रन पार्कच्या पायवाटांवर वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे उमटविले जाणार आहेत. म्हणजे लहानग्यांना चालताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळेल. तरुणाईला मोबाइल सेल्फीचा आनंद घेण्यासाठी नवे सेल्फी पॉइंट तयार करण्यात येत असून, त्याचा आकार नौकेसारखा आहे. सेल्फी पॉइंट हा नौका विहाराच्याजवळ उभारण्यात आला आहे.वन्यजीव जतन करण्याची कला प्राचिन असल्याने ती जवळून पाहण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. जंगलात आढळणाºया विविध प्रजातींच्या वाघांची व मांजरांची ओळख, त्यांची विस्तृत माहिती, त्यांच्या संदर्भातील समज-गैरसमज आणि जंगलातील त्यांचा अधिवास याबाबतची सखोल माहिती व्याघ्र परिचय केंद्रातून दिली जाणार आहे.केंद्राच्या इमारतीचा आकार हा आकर्षक असून, एखाद्या गुंफेप्रमाणे असणार असून, पर्यटकांसाठी महत्त्वाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, यात काही शंका नाही, असेही भाष्य शैलेश देवरे यांनी केले.