उच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 02:16 AM2018-11-22T02:16:24+5:302018-11-22T02:16:48+5:30
मलबार हिल येथील एका उच्चभ्रू इमारतीच्या एका फ्लॅटसमोर नवजात बालक सापडल्याने खळबळ उडाली. स्थानिकांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
मुंबई : मलबार हिल येथील एका उच्चभ्रू इमारतीच्या एका फ्लॅटसमोर नवजात बालक सापडल्याने खळबळ उडाली. स्थानिकांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. मात्र गेल्या १५ दिवसांपासून या मुलाच्या पालकांचा काहीही पत्ता लागलेला नाही.
मलबार हिल येथील न्यू शालीमार इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ५०४ च्या बाहेर कपड्यामध्ये गुंडाळलेले नवजात बालक आढळून आले होते. स्थानिकांकडून माहिती मिळताच मलबार हिल पोलीस तेथे हजर झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेतले. सध्या एका संस्थेच्या माध्यमातून बाळाची देखरेख सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हे बाळ नेमके कुणाचे आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच परिसरातील रुग्णालयांमध्येही चौकशी सुरू आहे. स्थानिक रहिवाशांकडेही याबाबत विचारपूस सुरु आहे.
स्थानिक रहिवासी किरण अग्रवाल (५८) यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दिली.