नव्याने दाखल वाघाला शोभेसा असणार जिजामाता उद्यानातील थाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:58 AM2020-02-25T00:58:50+5:302020-02-25T00:58:53+5:30
मुंबई : औरंगाबाद येथील प्राणिसंग्रहालयातून आलेल्या दोन पाहुण्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांची उत्सुकता वाढली आहे. मात्र सध्या त्यांच्या रुबाबाला साजेसे वातावरण ...
मुंबई : औरंगाबाद येथील प्राणिसंग्रहालयातून आलेल्या दोन पाहुण्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांची उत्सुकता वाढली आहे. मात्र सध्या त्यांच्या रुबाबाला साजेसे वातावरण भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात निर्माण करण्यात येत आहे. वाघाच्या या जोडीला शोभेसा थाट राणी बागेत तयार झाल्यानंतर ते पर्यटकांच्या भेटीला येणार आहेत.
राणी बागेचे नूतनीकरण सुरू असून या प्रकल्पांतर्गत १७ नवीन पिंजरे तयार करण्यात येत आहेत. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेले हॅम्बोल्ट जातीचे पेंग्विन राणी बागेचे विशेष आकर्षण ठरले. त्यानंतर आता बिबट्या, तरस, कोल्हा, अस्वल आणि वाघाची जोडी राणीच्या बागेत पाहायला मिळणार आहे. औरंगाबाद प्राणिसंग्रहालयातील शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडी दोन आठवड्यांपूर्वी राणी बागेत आणण्यात आली.
मात्र या आक्रमक आणि रुबाबदार प्राण्याच्या नैसर्गिक अधिवासासाठी विशेष व्यवस्था राणी बागेत केली जाणार आहे. येथे झाडे-झुडुपे, वृक्षवेली, हिरवळ यांची लागवड करून वाघाच्या पिंजऱ्यात त्यांना अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी चार लाख ९९ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याचे कंत्राट मे. डी. बी. कंपनीला देण्यात येणार आहे.
शक्ती हा वाघ तीन वर्षांचा आहे. त्याचा नोव्हेंबर २०१६ मध्ये औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात जन्म झाला. तर करिष्मा जुलै २०१४ मध्ये जन्मली आहे.
याआधी तरसाची जोडी राणी बागेत आणण्यात आली आहे. बिबट्या, अस्वल, कासव, तरस, कोल्हा या प्राण्यांसाठी दालने तयार करण्यात आली आहेत.
भारतात पहिल्यांदाच पक्ष्यांसाठी मुक्त विहार दालन तयार करण्यात आले आहे. यामध्ये देश-विदेशातले सुमारे शंभर पक्षी मुक्त विहार करणार आहेत.