अरब अमिरातीच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:05 AM2021-03-17T04:05:48+5:302021-03-17T04:05:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन सलमान मोहमद अलमर्झुकी यांनी मंगळवारी राज्यपाल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन सलमान मोहमद अलमर्झुकी यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेळा संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली असून, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील पूर्वापार दृढ असलेले संबंध आज सर्वोत्तम स्तरावर आहेत. आपल्या महाराष्ट्रातील कार्यकाळात व्यापार, वाणिज्य तसेच इतर क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे अलमर्झुकी यांनी राज्यपालांना सांगितले. गेल्या काही महिन्यांत अमिराती येथील अनेक रुग्ण मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी आले. त्यांना वैद्यकीय व्हिजा दिल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. मुंबईला आल्यापासून मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संयुक्त अरब अमिराती भारताचा दहावा सर्वांत मोठा थेट विदेशी गुंतवणूकदार आहे. वाणिज्यदूतांनी आपल्या कार्यकाळात येथील चेंबर ऑफ कॉमर्स व उद्योजकांशी संपर्क साधला. व्यापार संबंध अधिक दृढ करावेत, अशी इच्छा व्यक्त करीत संयुक्त अरब अमिरातीला भारतातील रिअल इस्टेट व पायाभूत सुविधा या क्षेत्रात गुंतवणुकीस वाव असल्याचे त्यांनी वाणिज्यदूतांना सांगितले. तर, संयुक्त अरब अमिरातीत राहणारे ३.५ दशलक्ष भारतीय हे दोन्ही देशांना जोडणारा दुवा असल्याचे राज्यपाल म्हणाले.
...........................