Join us

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वीकारला पदभार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 1:59 PM

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या नेतृत्वात फेरबदल करून काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या नेतृत्वात फेरबदल करून काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली होती. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी आज मावळते अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. थोरात यांच्यासोबतच नवनियुक्त कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, आ. बसवराज पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन यांनीही मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता.  त्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करत राज्यातील नेतृत्वात मोठे फेरबदल केले होते. यामध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर प्रदेशाध्यक्षपदासोबत पाच कार्याध्यक्षही नियुक्त करण्यात आले. डॉ. नितीन राऊत, आ. बसवराज पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. 
दरम्यान,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात,नवनियुक्त कार्याध्यक्ष आ. बसवराज पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. यशोमती ठाकूर, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी श्री सिद्धीविनायकाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमी येथे जात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 

 

टॅग्स :आ. बाळासाहेब थोरातकाँग्रेस