खातेवाटपाला मिळेना मुहूर्त; दालन, बंगल्यासाठी धावपळ; मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून लॉबिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 06:45 AM2022-08-13T06:45:04+5:302022-08-13T06:45:13+5:30

शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची ३० जून रोजी शपथ घेतली.

Newly elected maharashtra cabinet ministers are running to get a good bungalow. | खातेवाटपाला मिळेना मुहूर्त; दालन, बंगल्यासाठी धावपळ; मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून लॉबिंग सुरू

खातेवाटपाला मिळेना मुहूर्त; दालन, बंगल्यासाठी धावपळ; मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून लॉबिंग सुरू

googlenewsNext

- दीपक भातुसे 

मुंबई : एकनाथ शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार दिवस उलटले तरी मंत्र्यांचे खातेवाटप रखडलेले आहे. मात्र, खातेवाटप झाले नसले तरी मंत्रालयात प्रशस्त दालन मिळावे तसेच चांगला बंगला मिळावा म्हणून नवनिर्वाचित मंत्र्यांची धावपळ सुरू आहे. 

शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची ३० जून रोजी शपथ घेतली. त्यानंतर ३९ दिवस या दोघांचेच मंत्रिमंडळ राज्यात अस्तित्वात होते. त्यातही फडणवीस केवळ उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोणतेही खाते देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वच खात्यांचा कारभार अजूनही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच आहे. ९ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊन १८ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला तरी अजून खातेवाटपच झालेले नाही. असे असले तरी नवनिर्वाचित मंत्र्यांकडून मंत्रालयातील चांगली अंतर्गत सजावट असलेल्या दालनांचा तसेच चांगल्या बंगल्यांचा शोध सुरू आहे. त्यासाठी मंत्र्यांकडे काम करणारे त्यांचे खासगी पीए किंवा येऊ घातलेले खासगी सचिव कामाला लागले आहेत.

कोणते दालन चांगले आहे, कोणता बंगला चांगला आहे याची मंत्रालयातील कर्मचाऱ्यांकडे, पत्रकारांकडेही विचारणा करण्यात येत आहे.  असाच एक पीए मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत पहिल्या मजल्यावर फिरत होता. कोपऱ्यात असलेले दालन क्रमांक १०१ प्रशस्त असल्याचे त्याला सांगण्यात आले. अनिल देशमुख या दालनात बसायचे. त्यांना अटक झाल्यापासून ते बंद असल्याचे सांगताच संबंधित पीएने ‘नको रे बाबा’ असे म्हणत काढता पाय घेतला.

भूषण गगराणींना मनस्ताप 

अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी हे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत. मंत्रालयातील दालन आणि बंगले वितरणाचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. साहजिकच त्यामुळे मंत्र्यांचे पीए हे गगराणींच्या दालनात फेऱ्या मारत आहेत. दुसऱ्या कोणत्या मंत्र्याने चांगले दालन आणि बंगल्यावर हक्क सांगण्यापूर्वी तो बंगला आपल्याला मिळावा, यासाठी हा प्रयत्न आहे.

बंगल्यात आधीच ठेवले सामान!   

काही मंत्र्यांना मंत्रालयासमोर असलेल्या बंगल्यांपैकी बंगला हवा आहे, तर काही जणांना मलबार हिल इथल्या प्रशस्त बंगल्यांपैकी एक बंगला हवा आहे. त्यातही रामटेक, पर्णकुटी, रॉयल स्टोन हा बंगल्यांसाठी अनेक जण आग्रही असल्याचे समजते. एका मंत्र्याने तर बंगला वितरित होण्यापूर्वीच मंत्रालयासमोरील एका बंगल्यात आपले सामान आणून ठेवल्याचे सांगितले जात आहे. 

ज्येष्ठतेनुसार बंगले, दालन वाटप : बंगले आणि दालनाचे वाटप ज्येष्ठतेनुसार करण्याचे शिंदे सरकारने ठरविल्याचे समजते. १८ मंत्र्यांपैकी शिंदे गटातील सहा मंत्री यापूर्वीही मंत्रिमंडळात होते. त्यामुळे त्यांच्याकडे बंगले आणि  दालन आहे. यातील केवळ राज्यमंत्री असलेल्या आणि आता कॅबिनेट मंत्री झालेल्या मंत्र्यांना चांगले दालन आणि बंगला हवा आहे. तर पूर्वी जे मंत्री नव्हते अशा १२ मंत्र्यांना दालन आणि बंगले वितरित करायचे आहेत.

Web Title: Newly elected maharashtra cabinet ministers are running to get a good bungalow.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.